खडकवासला बाह्यवळण, पानशेत रस्त्याचे काम सुरू | पुढारी

खडकवासला बाह्यवळण, पानशेत रस्त्याचे काम सुरू

खडकवासला : पुढारी वृत्तसेवा : अर्धवट अवस्थेतील पूल, खोदकाम, साईडपट्ट्या नसल्याने मृत्यूचा सापळा बनलेल्या खडकवासला बाह्यवळण रस्त्यासह पुणे-पानशेत,खानापूर-रांजणे घाटरस्त्याच्या रखडलेल्या कामांना सार्वजनिक बांधकाम विभागाने अखेर सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या कामामुळे पर्यटकांसह नागरिकांना वाहतूक कोंडी, अपघात अशा समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या बाबत दै. ’पुढारी’त वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध झाले होते.

विधिमंडळातही याबाबत पडसाद उमटले होते. गेल्या आठवड्यात खडकवासला बाह्यवळण रस्त्यावर दुचाकी घसरून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. रस्त्याच्या कामावरून माजी सरपंच सौरभ मते व संतप्त नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला होता. गोर्‍हे बुद्रुक येथे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांसह नागरिकांनी ’रास्ता रोको’ आंदोलन करून रखडलेल्या कामाकडे लक्ष वेधले होते. खडकवासला बाह्यवळण रस्त्यावर गतिरोधक बसविण्याचे काम गुरुवारी सुरू करण्यात आले . तसेच गावातील रखडलेल्या रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे कामही युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. गोर्‍हे बुद्रुक येथे काँक्रीटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे. खडकवासल्याचे माजी सरपंच सौरभ मते म्हणाले, ‘पर्यटक वाढल्याने वाहतूक वाढली आहे. दुसरीकडे रस्त्याच्या अर्धवट कामामुळे अपघातांची मालिका सुरू आहे. खडकवासला बाह्य रस्त्याच्या साईडपट्ट्या करणे आवश्यक आहे.

Back to top button