पालेभाज्यांना चांगला दर ! बाजारपेठांमध्ये आवक घटल्याचा परिणाम | पुढारी

पालेभाज्यांना चांगला दर ! बाजारपेठांमध्ये आवक घटल्याचा परिणाम

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : उन्हाळ्यामध्ये पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण अधिक असते. बाजारपेठांमध्ये आवक घटल्यानेच बाजारभाव वाढले आहेत. त्यामुळे मेथी, कोथिंबीर, शेपू या पालेभाज्यांना सध्या चांगला दर मिळत आहे. आंबेगाव तालुक्याच्या पूर्वभागात सध्या पालेभाज्यांची काढणीची कामे वेगात सुरू आहेत. या परिसरात पालेभाज्यांची पिके वरचेवर घेणारे शेतकरी सर्वाधिक आहेत. उन्हाळी हंगामात या पालेभाज्यांची पिके घेणे जिकिरीचे असते. वातावरणातील उष्णतेमुळे पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते, तसेच पालेभाज्यांवर विविध रोगराईंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. औषध फवारणी करावी लागली.

या परिसरात पारगाव, शिंगवे, रांजणी, वळती, नागापूर, थोरांदळे आदी परिसरात सध्या पालेभाज्यांची काढणी सुरू आहे. सध्या मेथीला जुडीला 25 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे, तर कोथिंबिरीला जुडीला 15 रुपयांपर्यंत बाजारभाव मिळत आहे. शेपूलादेखील 10 रुपयांपर्यंत जुडीला बाजारभाव मिळत आहे. हे बाजारभाव चांगले मिळत असले, तरी शेतकर्‍यांकडे असलेल्या पालेभाज्यांची मर अधिक झाल्याने उत्पादनात घट झाली आहे.

भाज्या खराब होऊ नये यासाठी काळजी
सध्या पालेभाज्यांची काढणी सुरू आहे. परंतु वातावरणात उष्णता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे पालेभाज्या काढल्यानंतर त्या लगेचच सुकतात. बाजारपेठेत नेईपर्यंत त्या खराब होतात. परिणामी, बाजारभाव कमी मिळतो. पालेभाज्या उन्हामुळे खराब होऊ नये यासाठी शेतकरी विशेष काळजी घेताना दिसत आहेत. पालेभाज्यांच्या जुड्या सावलीत रचून ठेवाव्या लागत आहेत.

Back to top button