माती धरण कोरडेठाक ; पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी | पुढारी

माती धरण कोरडेठाक ; पाण्याचे टँकर सुरू करण्याची मागणी

वाफगाव : पुढारी वृत्तसेवा : वाफगाव (ता. खेड) परिसराला पाणीपुरवठा करणारे माती धरण कोरडे ठणठणीत पडल्याने तीव— पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस कमी पडत असल्याने दर वर्षी येथील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. गतवर्षी पाऊस चांगला झाल्याने वाफगाव परिसरातील शेतीसाठी उपयुक्त असलेले धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहिले. या वर्षी पाणीटंचाई भासणार नाही, अशी अपेक्षा येथील नागरिकांची होती. परंतु, नियोजन नसल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात धरणातून पाणीउपसा झाला.

28 फेब्रुवारीपासून पाणीउपसा बंद करण्याचे शासनाचे आदेश असतानादेखील लघु पाटबंधारे विभागाने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे कधी नव्हे, एवढ्या मोठ्या प्रमाणात वाफगाव गावठाण व वाड्यावस्त्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कडक उन्हाळ्यामुळे परिसरातील विहिरी व हातपंपाचे पाणी कमी झाले आहे. तसेच, पाझर तलाव, बंधारे व पाणवठे पाण्याअभावी कोरडे ठणठणीत पडले आहेत. जनावारांचेदेखील पाण्याअभावी हाल सुरू आहेत.

येथील पाणीटंचाई लक्षात घेता वाफगावचे सरपंच राजेंद्र टाकळकर यांनी स्व:खर्चाने धरणातून पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीतील गाळ काढला आहे. त्यामुळे नळाला आठ दिवसांतून पाणी येत आहे. हे पाणी पुरेसे नाही. अनेक नागरिक व वस्तीला पाणी मिळत नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडे 15 दिवसांपूर्वी प्रस्ताव देण्यात आला असून, पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर टँकर सुरू करावा, अशी मागणी सरपंच टाकळकर व ग्रामस्थांनी केली आहे.

Back to top button