

दौंड : पुढारी वृत्तसेवा : दौंड नगरपालिकेने शहरातील कचरा उचलण्याचा लाखो रुपयांच्या ठेका दिला आहे. परंतु, दौंड शहरात सर्वत्र कचरा दिसत आहे. नगरपालिकेकडे अनेकदा तक्रारी करूनही मस्तावलेला ठेकेदार कोणालाच जुमानत नसल्याचे दिसत आहे.
ठेकेदाराला राजकीय वरदहस्त आहे, अशी चर्चा आहे. भैरवनाथ गल्ली, भाजी मंडई परिसर, डिफेन्स कॉलेज भागात व शहराच्या इतरही भागांत कचरा अस्ताव्यस्त पडलेला असतो. मागील चार दिवसांपासून डिफेन्स कॉलेजलगत चार डुकरे मरून पडली होती.
त्याची प्रचंड दुर्गंधी पसरली होती, परंतु ठेकेदाराला काही देणे-घेणे दिसले नाही. नगरपालिकेने कचरा उचलण्याचा दिलेला ठेका हा सुरुवातीपासूनच वादात अडकला होता. केवळ नगरपालिकेने नावापुरता ठेका दिल्याचे बोलले जाते. नुकतेच नव्याने रुजू झालेल्या मुख्याधिकार्यांनी शहरातील सर्व भागांची पाहणी करावी. बेजबाबदार कचरा ठेकेदारावर कारवाई करावी, ही मागणी होत आहे.
डिफेन्स कॉलनीजवळ मोठ्या अनर्थाची भीती
डिफेन्स कॉलनी रोडला महावितरणची रोहित्राची वायर बाहेरच असून, त्यालगतही कचरा टाकलेला असतो. कोणी तरी अज्ञात व्यक्ती त्या कचर्याला आग लावतात, असेही घडते. नगरपालिका व महावितरण यांच्यात समन्वय नसल्याने एके दिवशी येथे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे.
..