पुणे : शिवगंगा खोर्‍यात अवकाळीचा तडाखा विजांचा कडकडाट, गारांचा वर्षाव | पुढारी

पुणे : शिवगंगा खोर्‍यात अवकाळीचा तडाखा विजांचा कडकडाट, गारांचा वर्षाव

नसरापूर : पुढारी वृत्तसेवा :  शिवगंगा खोर्‍यात बहुतांश ठिकाणी गुरुवारी (दि. 13) विजांच्या कडकडाटसह गारांचा पाऊस झाला, यामुळे हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास विजेच्या कडकडाटसह गारांचा पाऊस पडल्याने शेतकर्‍यांची तारांबळ उडाली. वादळी पावसामुळे शिवगंगा खोर्‍यातील कांदे, टोमॅटो, वांगी, भुईमूग तसेच काही ठिकाणी काढणीस आलेल्या ज्वारीसह गहू, पालेभाज्यांचे नुकसान झाले.

पावसामुळे नसरापूर बाजारपेठेत नागरिकांची धावपळ उडाली. वादळी वार्‍यामुळे रात्री उशिरापर्यंत विद्युत पुरवठा खंडित झाला. पावसाने झोडपल्यामुळे शेतातील टॉमेटो, वांगी, कांदा, ज्वारी व उन्हाळी भुईमूग आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे आंब्यासह, कलिंगड पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. कामथडी, कापूरहोळ, हातवे, सणसवाडी, तांभाड, माळेगाव, सांगवी, खडकी, जांभळी, निधान-सांगवी, केळवडे, साळवडे, वरवे, शिवरे भागात पावसाचा जोर अधिक होता.

पुलावर साचले तळे
नसरापूर – वेल्हा मार्गावरील शिवगंगा नदीवरील पुलाच्या डागडुजीकडे सार्वजनिक विभागाच्या अधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. पुलावरील राडारोडा न काढल्याने पावसाचे पाणी पुलावर साचले. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांना कसरत करावी लागली.

Back to top button