डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यात जनसागर उसळला | पुढारी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी पुण्यात जनसागर उसळला

पुणे : पुढारी वृत्तसेवा :

पांढऱ्या शुभ्र कपड्यांवर निळा शेला, हातात निळा झेंडा, छातीवर बाबांचा बिल्ला, हार-फुले अर्पन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी झालेली अबाल वृद्धांची अलोट गर्दी आणि ‘भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ अशा घोषणांनी दुमदुमून गेलेला परिसर. ‘सोनियाची उगवली सकाळ… जन्मास आले भिम बाळ’ यांसह विविध भीम गीतांनी दणाणलेला परिसर. हे चित्र आहे पुणे रेल्वे स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरातील.

बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर सहकुटुंब फोटो काढण्यासाठीची धडपड, अशा उत्साहपूर्ण वातावरणात शुक्रवारी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी होत आहे. जयंतीनिमित्त पुणे स्टेशन परिसरातील आणि कॅम्प परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरास आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. अभिवादन करण्यास येणाऱ्या अनुयायांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मंडप टाकण्यात आलेला आहे. मध्यरात्री बारा वाजता बुद्ध वंदना घेऊन अनेकांनी बाबासाहेबांच्या जन्माचे स्वागत केले. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांनी गुरूवारी रात्री 11 पासूनच स्टेशन परिसरात मोठी गर्दी केल्याने संपूर्ण परिसर फुलून गेला होता. प्रत्येकजन बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व मेनबत्ती लावून अभिवादन करत होते.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे रेल्वे स्थानक परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी आमदार दीपक पायगुडे, हेमंत रासने, गणेश बिडकर यांच्यासह आदी विविध संघटनांचे पदधिकारी उपस्थित होते. पाटील यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या १ लाख नागरिकांसाठी मास्टर शेफ विष्णू मनोहर यांच्या हस्ते मिसळ व ताक बनविण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ केला.

पुणे स्टेशनचा संपूर्ण परिसर रात्री बारापासून पांढरी शुभ्र कपडे परिधान केलेल्या अबाल वृद्ध अनुयायांनी फुलून गेला होता. आलेल्या अनुयायांना सामाजिक संस्था व सेवाभावी व्यक्तींच्या वतीने थंड पेय, पाणी, खाद्यपदार्थ, चहा वाटप करण्यात येत होते. पुस्तके, महापुरूषांचे फोटे, पोस्टर्स, निळ्या टोप्या, बाबासाहेब, भगवान बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज यांचे बिल्ले, रंगीबेरंगी फुगे, बाबासाहेबांना अर्पण करण्यासाठी हार-फुले व मेनबत्त्या, खेळणी, पुस्तके असे विविध स्टॉल या ठिकाणी आहेत.

पोलिसांचा चोख बंदोबस्त :
जयंतीदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहर पोलिसांच्या वतीने पुणे स्टेशन व कॅम्प परिसरात चोख बंदोबस्त ठेवला आहे. स्टेशन आणि कॅम्प परिसरातील बाबासाहेबांच्या पुतळा परिसरात पोलिस व अग्निशामक दल वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे.

Back to top button