पिंपरी: भीमसागराच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही रस्त्यावर | पुढारी

पिंपरी: भीमसागराच्या सुरक्षेसाठी तगडा बंदोबस्त, स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखाही रस्त्यावर

पिंपरी(पुणे ), पुढारी वृत्तसेवा: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जंयती शुक्रवारी (दि. 14) साजरी होत आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांचा शहर परिसरात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे.

दरवर्षी महामानवाला अभिवादन करण्यासाठी पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात अनुयायी मोठ्या संख्येने जमा होतात. दरम्यान, काही समाजकंटक समाजबांधवांच्या भावना भडकावून देतात. त्यामुळे पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली असून गोपनीय यंत्राना ‘अलर्ट’ दिला आहे. एकंदरीतच दरवर्षीच्या तुलनेत यंदा पोलिसांनी जास्त खबरदारी घेतल्याचे दिसून येत आहे.

मिरवणुकांमध्ये साध्या वेशातील पोलिस

वाकड व पिंपरी परिसरातून येणार्‍या मिरवणुका काळेवाडी उड्डाणपूल – शगुन चौक – पिपरी रेल्वे पूल मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात येतात. भोसरी एमआयडीसी, मोशी पिंपरी परिसरातील मिरवणुका रसरंग चौक- घरोंदा हॉटेल मोरवाडी चौक मार्गे पिंपरी चौकात येतात. देहूरोड, निगडी, चिखली, चिंचवड भागातील मिरवणुका जुना मुंबई- पुणे महामार्ग येथून भक्ती-शक्ती चौक, पिंपरी पोलीस स्टेशन समोरुन मोरवाडी चौक मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पिंपरी चौक येथे एकत्र येतात. भोसरी पोलीस स्टेशन हददीतील मिरवणुका जुना मुंबई पुणे महामार्गाने नाशिकफाटा मार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा पिंपरी चौक येथे एकत्र येतात. मिरवणूका दरम्यान काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी गणवेशधारी पोलिसांसह साध्या वेशातील पोलिसही नियुक्त करण्यात आले आहेत.

गुंडांवर राहणार विशेष लक्ष

जातीय सलोखा बिघडविण्याच्या दृष्टीने काही समाजकंटक, कट्टरवादी संघटना जाणीवपूर्वक जातीय भावना भडकविण्याचा प्रयत्न करीत असतात. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जातीय संघटना त्यांचे कार्यकर्ते आणि जातीयवादी गुंड यांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे.

नियंत्रण कक्ष येथे राखीव बंदोबस्त

हद्दीत ऐनवेळी तैनात करण्यासाठी नियंत्रण कक्ष येथे पाच अधिकारी आणि सुमारे 70 कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. याशिवाय जलद प्रतिसाद पथक, एसआरपीएफ यासारख्या तुकड्या हद्दीत तैनात असणार आहेत. तसेच, पोलिसांच्या मदतीसाठी होमगार्डही देण्यात आले आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शहरात पुरेसा बंदोबस्त देण्यात आला आहे. ठिकठिकाणी विशेष पथके तैनात राहणार आहेत. दरम्यान, नागरिकांना कोठेही अनुचित प्रकार आढळून आल्यास पोलिसांना याबाबत माहिती द्यावी.
– डॉ. संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी- चिंचवड

असा असेल बंदोबस्त
परिमंडळ 1
19 पोलिस निरीक्षक, 74 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 678 अंमलदार

परिमंडळ 2
15 पोलिस निरीक्षक, 66 सहायक निरीक्षक/ उपनिरीक्षक, 615 अंमलदार
गुन्हे शाखेचा बंदोबस्त
5 पोलिस निरीक्षक, 2 सहायक निरीक्षक, 70 अंमलदार

Back to top button