पुण्याबाहेरील बांधवांसाठी सहेरीची व्यवस्था | पुढारी

पुण्याबाहेरील बांधवांसाठी सहेरीची व्यवस्था

वडगाव शेरी : पुढारी वृत्तसेवा :  शिक्षण आणि कामानिमित्त पुणे शहराबाहेरून आलेल्या व होस्टेलमध्ये राहणार्‍या मुस्लिम बांधवांना रमजान महिन्याचे उपवास धरता येत नाहीत. बर्‍याचदा त्यांच्या सहेरीची (उपवास सुरू करताना करण्यात येणारी पहाटेची न्याहारी) व्यवस्था नसते. हाच विचार करून वडगाव शेरीतील नुरे इलाही मशिदीतर्फे प्रथमच अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पूर्व भागात राहणार्‍या, देशाच्या विविध भागांतून आलेल्या मुस्लिम बांधवांना सहेरी सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून, सुमारे अडीचशे मुस्लिम बांधव यांचा लाभ घेत आहेत. वडगाव शेरीमधील नुरे इलाही मशिदीमध्ये परगावच्या मुस्लिम बांधवांसाठी सहेरीची व्यवस्था करण्यात आली आहे.

कादिर शेख, अब्दुल शेख, जियाउद्दीन सैयद, समीर शेख, नसरुद्दीन खान, इरफान खान, सोहेल शेख यांच्या पुढाकाराने सर्व पदाधिकारी या उपक्रमासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून झटत आहेत. सहेरीची व्यवस्था करण्यासाठी रात्री बारा वाजल्यापासून तयारी सुरू करावी लागते. मशिदीतील अनेक पदाधिकारी जागून ही व्यवस्था पाहतात. सहेरीची वेळ जवळ आल्यावर होस्टेलवर राहणा-या बांधवांना फोन करून सहेरीची तयारी झाल्याचे कळवले जाते.

गेल्या चार वर्षांपासून ट्रस्टच्या वतीने सहेरीचा कार्यक्रम राबविला जात आहे. दररोज जवळपास 450 नागरिक या उपक्रमाचा लाभ घेतात. या उपक्रमासाठी स्थानिक नागरिक तसेच इतर मान्यवर निधी देतात. सर्वांच्या मदतीने हा उपक्रम राबविला जातो.
                                                                    – अब्दुल शेख, पदाधिकारी

उपक्रम कौतुकास्पद
उपवास पहाटे सुरू होतो. त्या वेळी कोणतेही हॉटेल सुरू नसते, यामुळे अनेकदा उपवास करता येत नाही. ट्रस्टच्या सहेरीच्या उपक्रमामुळे पुण्यात कामानिमित्त आलेल्या बांधवांना उपवास करता येत आहे. ट्रस्टचा उपक्रम खूपच छान आहे, असे मत तारिक पठाण (मूळ रा. उस्मानाबाद, सध्या. वडगाव शेरी ) यांंनी व्यक्त केले.

Back to top button