

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात रात्रीच्या वेळी रिक्षातून रिक्षांच्या टायरची आणि बॅटर्यांची चोरी करणार्या सराईताला समर्थ पोलिस ठाण्याच्या पथकाने शिताफीने अटक केली. चोरीच्या वेळी वापरण्यात आलेल्या रिक्षाचा ब—ेक लावल्यानंतर फ्लॅश लाईट लागत होती. सीसीटीव्हीत हाच प्रकार निदर्शनास आल्याने पथक चोरट्यापर्यंत पोहचले. शादाब युसुफ अन्सारी (22, गल्ली नंबर 25, सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समर्थ पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपासून रिक्षांचे टायर चोरी झाल्याच्या अनुषंगाने तपास करत होते.
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर एक रिक्षा त्या भागात येऊन रिक्षाच्या बाजूला रिक्षा लावून चोरी करीत असल्याचे दिसून आले. चोरी करणार्या रिक्षाचा ब—ेक मारल्यास पाठीमागे फ्लॅश लाईट लागत असल्याचे दिसून आल्याने पथकाने अशा रिक्षांचा शोध घेतला. रिक्षात पथकाला एका पोत्यात भरलेले आठ टायर आणि दोन बॅटर्या सापडल्या. अधिक चौकशीमध्ये त्याने आणखी चोरलेले टायर पोलिसांच्या हवाली केले. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याच्याकडून 25 रिक्षांचे टायर व दोन रिक्षाच्या बॅटर्या जप्त करण्यात आल्या आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे, गुन्हे निरीक्षक प्रमोद वाघमारे, तपास पथकातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलिस उपनिरीक्षक सौरभ माने, अमंलदार रहिम पेरेणे, दत्तात्रय भासेले, रोहिदास वाघीरे, रहिम शेख, नीलेश जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
अटक करण्यात आलेल्या अन्सारी याच्यावर सहा चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तो भाडेतत्त्वावर रिक्षा चालवत होता. नंतर रात्रीच्या वेळी उभ्या असलेल्या रिक्षांचे टायर चोरत होता. त्याच्या रिक्षाच्या फ्लॅश लाईटवरून त्याला अटक करण्यात आली.
– रमेश साठे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, समर्थ पोलिस ठाणे.