लाईक, सबस्क्राईबच्या नावाखाली लाखोंचा गंडा | पुढारी

लाईक, सबस्क्राईबच्या नावाखाली लाखोंचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  नागरिकांना ऑनलाईन आर्थिक गंडा घालण्यासाठी सायबर चोरटे नेहमी वेगवेगळ्या क्लृप्त्यांचा वापर करत असतात, आता असाच एक नवीन प्रकार समोर आला आहे. बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन सायबर चोरट्यांनी पार्टटाईम जॉबचा नवा फंडा काढला असून, लाईक आणि सबस्क्राईबच्या नावाखाली अनेकांच्या बँक खात्यावर ते हात साफ करत आहेत.

‘पार्टटाईम जॉब करून प्रतिदिन अडीच ते तीन हजार रुपये कमवा,’ अशा जाहिरातीला बेरोजगार फसत असून, अनेकजण या प्रलोभनाला बळी पडून आपले लाखो रुपये गमवत असल्याचे वास्तव आहे. सायबर चोरट्यांच्या नव्या फंड्यात अनेकजण अडकत आहे. आपटे रोडवरील एक 54 वर्षांचा नागरिक या मोहाला बळी पडला आणि 3 लाख 68 हजार रुपये गमावून बसला आहे. हा प्रकार 23 ते 16 मार्चदरम्यान घडला.

अशी झाली फसवणूक
फिर्यादींना पार्टटाईम जॉब करून प्रतिदिनी 2500 रुपये कमवा असा मेसेज आला.
यू-ट्युबवर काही जाहिरातीचे लिंक्स लाईक व सबक्राईब केल्यास प्रति व्हिडिओस 30
रुपये मोबदला मिळेल, असे सांगितले गेले.
तीन व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना टेलिग्रॉम अ‍ॅप डाऊनलोड करण्यास सांगण्यात आले. त्यांचा आयडी तयार करण्यात आला. प्रथम त्यासाठी त्यांना 50 रुपये ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. थोड्या वेळाने त्यांच्या खात्यात 90 रुपये जमा झाले.
त्यांना एका ग्रुपमध्ये समाविष्ट करण्यात आले. तुम्ही प्रिपेड टास्क केल्यास अ‍ॅडव्हान्स 20 टक्के कमिशन मिळेल, असे सांगितले. त्यांनी डेमो व्यवहार करून घेतले. त्यानंतर त्यांना प्रिपेड टास्क देण्यात आला.
त्यासाठी एक हजार रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्याबदल्यात 1200 रुपये व 210 रुपये व्हिडिओ बघण्याचे
बदल्यात असे 1410 रुपये त्यांच्याकडे जमा झाले.
त्यांना मोठमोठ्या रकमेचे नवीन नवीन टास्क देण्यात येत होते. त्यांनीदेखील प्रलोभनाला बळी पडत सायबर चोरटे सांगतील त्याप्रमाणे पैसे भरले.
त्यानंतर मात्र त्यांना पैसे परत मिळाले ना नफा !

घरी बसल्यानंतर एका क्लिकवर तुम्हाला एक आणि दोन लाख रुपये कोणी देत नाही. सहज पैसे मिळविण्याच्या प्रलोभनाला आपण बळी पडतो आणि आपल्याकडील कष्टाचे पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली करतो. त्यामुळे पैशाच्या प्रलोभनाला बळी न पडता नागरिकांनी असे कोणतेही टास्क घेऊ नयेत. ते सायबर चोरट्यांनी लावलेले सापळे आहेत. अशा दहा तक्रारी सायबर पोलिस ठाण्यात आल्या असून, दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
                           – मीनल पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर विभाग.

Back to top button