पुणे महापालिकेला ‘ग्रीन सिटी’ पुरस्कार | पुढारी

पुणे महापालिकेला ‘ग्रीन सिटी’ पुरस्कार

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलच्या (आयजीबीसी) ग्रीन एक्झिस्टिंग सिटीज रेटिंग सिस्टीम अंतर्गत पर्यावरणपूरक विकासासाठी पुणे महापालिकेला ‘ग्रीन सिटी’ पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळवणारे पुणे हे राज्यातले पहिले, तर अहमदाबादनंतर देशातील दुसरेच शहर ठरले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी शहरात राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांसाठी कॉन्फिडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज (सीआयआय), इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल आणि क्रेडाई पुणे मेट्रोतर्फे दिला जाणारा हा पुरस्कार राज्यसभा खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या हस्ते महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार व पर्यावरण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी स्वीकारला.

‘यशदा’चे महासंचालक एस. चोकलिंगम, सीआयआय-आयजीबीसीचे उप कार्यकारी संचालक एम. आनंद, ग्रीन फॅक्टरी रेटिंग सिस्टीमचे अध्यक्ष प्रदीप भार्गव, आयजीबीसी पुणे शाखेचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, सह-अध्यक्ष पूर्वा केसकर, मुख्य समिती सदस्य प्रणती श्रॉफ, क्रेडाई पुणे मेट्रोचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे, महासंचालक डॉ. डी. के. अभ्यंकर यावेळी उपस्थित होते.

हा पुरस्कार म्हणजे महापालिकेच्या चांगल्या कामगिरीला मिळालेली दाद आहे. मात्र, त्याचवेळी हवामान बदल हे शहरासमोरचे सर्वात मोठे आव्हान असून, आपले पर्यावरण आणि पृथ्वीचे संरक्षण करण्यासाठी आणखी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
                                                                    – अ‍ॅड. वंदना चव्हाण, खासदार

पुणे शहर कायमच सर्वात चांगले राहण्यायोग्य शहर राहील, यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. विकासकामे करतानाही पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जात आहे.
                                                     – विक्रम कुमार, आयुक्त, महापालिका

Back to top button