पुणे-पानशेत रस्त्यावर कचर्‍याचे ढिगारे; पर्यटकांसह नागरिक त्रस्त | पुढारी

पुणे-पानशेत रस्त्यावर कचर्‍याचे ढिगारे; पर्यटकांसह नागरिक त्रस्त

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : सिंहगड, पानशेत, खडकवासला धरण अशी पर्यटनस्थळे तसेच भारतीय लष्कराच्या संस्था, शासकीय, निमशासकीय संस्था असलेल्या पुणे-पानशेत रस्त्याच्या कडेला कचर्‍यारे ढिगारे पडले आहेत. यासोबतच सांडपाणी तसेच मैलापाणी वाहत आहे. याच्या दुर्गंधीमुळे पर्यटकांसह नागरिक त्रस्त झाले आहे.

महापालिका हद्दीत कचरा गोळा केला जात आहे. मात्र, तेथून पुढे पानशेत रस्त्यावर येणार्‍या बहुतेक ग्रामपंचायत हद्दीत कचर्‍यांचे ढीग रस्त्याच्या दोन्ही बाजूला साठले आहेत. ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम राबवूनही बेशिस्त नागरिक, व्यावसायिक, फिरण्यासाठी येणारे पर्यटक रस्त्यावर कचरा टाकत असल्याचे चित्र पुढे आले आहे.

डोणजे चौक रस्ता, गोर्‍हे खुर्द, खानापूर ,मणेरवाडी खिंड आदी दुर्गंधीमुळे नागरिकांना ये-जा करताना नाकाला रुमाल लावूनच प्रवास करावा लागत आहे. खानापूर (ता. हवेली) येथील महात्मा गांधी विद्यालयापासून मांडवी स्टाप ते बापुजीबुवा खिंडीपर्यंतच्या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सडलेल्या कचर्‍याचे ढिगारे साठले आहेत. अवकाळी पावसामुळे त्याला दुर्गंधी पसरली आहे. ढिगार्‍यात सडलेले खाद्यपदार्थ, मांस त्यामुळे तेथे मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट सुरू आहे. मोकाट कुर्त्यांमुळे ये-जा करताना वाहनचालकांना संकटांला सामोरे जावे लागत आहे.

बेशिस्त नागरिक, व्यावसायिक कारणीभूत
एकीकडे रस्त्याचे रुंदीकरण होऊन थेट पानशेत-वरसगाव धरणापर्यंत रस्ता चकाचक झाला आहे. दुसरीकडे कचरा टाकणार्‍या बेशिस्त नागरिक, व्यावसायिकांवर कारवाई होत नसल्याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून पुणे-पानशेत रस्त्यावरील कचर्‍याची समस्या दिवसेंदिवस वाढतच आहे.

रस्त्याचे रुंदीकरण झाले. मात्र, रस्त्यावर कचरा फेकला जात आहे. काही ठिकाणी सांडपाणी तसेच मैलापाणी सोडले जात आहे. यास प्रशासनाने प्रतिबंधक करावा.

          – बाजीराव पारगे, अध्यक्ष, दिव्यांग विकास संस्था, डोणजे.

रस्त्यावर मैलापाणी, सांडपाणी सोडले जात आहे, अशा ठिकाणांची पाहणी करून संबंधितांना नोटीस देण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्यास मनाई असतानाही अशा ठिकाणी कचरा टाकला जात असून, याबाबत स्थानिक ग्रामपंचायतींना सूचना देण्यात आल्या आहेत.

एस. ए. रणसिंग, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, हवेली.

Back to top button