कुटुंबीयांच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर; सांगवीच्या इतिहासातील पहिलीच घटना | पुढारी

कुटुंबीयांच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर; सांगवीच्या इतिहासातील पहिलीच घटना

अनिल तावरे

सांगवी : बारामती तालुक्यातील सांगवी येथील विनोद हिराचंद फडतरे (वय 30) या मनमिळाऊ युवकाचा खून झाला. या घटनेने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे, तसेच कुटुंबीयांच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर झाले होते. सांगवी गावच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. शांत, संयमी स्वभाव असलेल्या विनोदचा खून झाल्याची माहिती समजल्यानंतर अनेकांना विश्वास बसत नव्हता. विनोद हा नेहमीच युवकांच्या गराड्यात असायचा. अशा व्यक्तीचा अशाप्रकारे मृत्यू होईल, असे कोणालाच वाटत नव्हते.

विनोद हा नेहमीच अनेकांच्या मदतीला धावून जात असे. विनोदने कुटुंबाच्या प्रतिकूल परिस्थितीत जमीन खरेदी केली होती. तसेच, त्याने सातारा-लोणंद राज्यमार्गावर आदर्की फाटा येथे टायर विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तो व्यवसायसुध्दा चांगल्या प्रकारे चालू होता. त्याच्या आयुष्याला चांगली सुरुवात झाली असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

विनोद फडतरे यांच्या पश्चात आई, एक भाऊ, पत्नी, एक अडीच वर्षांची मुलगी, भावजय असा परिवार आहे. बुधवारी सायंकाळी विनोदाचा मृतदेह घरी आणला असता त्याच्या नातेवाइकांनी त्याचा मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडल्यानंतर अक्षरशः उपस्थितांची मने हेलावून गेली होती. बारामती तालुक्यात सांगवी हे गाव संवेदनशील म्हणून ओळखले जाते. परंतु, आजतागायत अशी घटना इतिहासात कधीच घडली नव्हती. मात्र, विनोद फडतरे यांच्या मृत्यूमुळे गावच्या नावलौकिकाला गालबोट लागल्याची चर्चा दबक्या आवाजात होताना ऐकायला मिळत आहे.

सांगवीत तंटामुक्तीचे काढले वाभाडे
गावात अलीकडच्या काळात विविध चर्चा होताना दिसत आहे. त्यात गावात तंटामुक्त समिती म्हणजे ‘असून अडचण, नसून खोळंबा’ अशीच काहीशी परिस्थिती आहे. बुधवारी विनोद फडतरे या युवकाचा खून झाला त्या घटनास्थळी विनोद याचे मेहुणे धनंजय जाधव यांनी संताप व्यक्त करीत तुमच्या गावच्या राजकारणात तुमची तंटामुक्त समिती काय करतेय? तुमच्या कुरघोड्या बाजूला ठेवून गोरगरीब जनतेला न्याय द्या, यासह विविध प्रकारची कारणे देत अक्षरशः गावच्या कारभाराचे वाभाडे काढले.

Back to top button