वेल्हे : वादळी पावसाने ज्वारी, आंब्याचे नुकसान | पुढारी

वेल्हे : वादळी पावसाने ज्वारी, आंब्याचे नुकसान

वेल्हे; पुढारी वृत्तसेवा : पश्चिम हवेली तालुक्यातील सिंहगड परिसरात मंगळवारी (दि. 11) सायंकाळी पडलेल्या जोरदार वादळी पावसाने कापणी केलेल्या ज्वारीपिकासह फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. गेल्या महिनाभरापासून अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. अद्यापही ढगाळ वातावरण असल्याने अवकाळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार वार्‍यामुळे कैर्‍या पडून गेल्या असून, झाडांखाली खच पडलेला आहे. तसेच, पेरू, चिकूच्या बागांचीही तीच अवस्था झाली आहे.

तर, भाजीपाला पिकांनाही चांगलाच फटका बसला आहे. गोर्‍हे बुद्रुक येथील सचिन सुरेश तिपोळे यांनी दोन एकर क्षेत्रांतील ज्वारीची कापणी केलेली आहे. या ज्वारीत पाणी शिरून मोठे नुकसान झाले. दिव्यांग आघाडीचे भाजप जिल्हाध्यक्ष बाजीराव पारगे, खडकवासला भाजपचे उपाध्यक्ष रूपेश घुले यांनी सिंहगड भागातील नुकसानीची पाहणी केली. सिंहगड पायथ्याच्या मणेरवाडी येथे पाच शेतकर्‍यांच्या आंब्याच्या बागांचे नुकसान झाले आहे. बुधवारी (दि. 12) सकाळी सिंहगड विभागाचे मंडल कृषी अधिकारी शिवाजी खटके, कृषी पर्यवेक्षक वैभवराज पवार, कृषी सहायक नितीन ढमाळ यांच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली.

सिंहगड, खानापूर, मणेरवाडी भागांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांसह फळबागांचे पंचनामे सुरू आहेत. या आधीही नुकसानीचे पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

                                                            – मारुती साळे,
                                               हवेली तालुका कृषी अधिकारी

Back to top button