पुणे : मोठ्या पदपथांची रुंदी होणार कमी | पुढारी

पुणे : मोठ्या पदपथांची रुंदी होणार कमी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : रुबी हॉल क्लिनिक ते आरटीओ यादरम्यानच्या ‘राजा बहादूर मिल’ रस्त्यावरील पदपथ रस्त्यापेक्षा मोठे केल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागतात. याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने मंगळवारी प्रसिद्ध केल्यानंतर महापालिका प्रशासनाने मोठ्या पदपथांची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात बुधवारपासून बाणेर आणि रुबी हॉलसमोरील पदपथांपासून करण्यात आली आहे.

शहरात 2016 पासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असून, शहरातील गजबजलेल्या रस्त्यावरून सुरू आहे. हे सर्व रस्ते महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत तयार केले होते. त्यामुळे या रस्त्यांवर पालिकेने पदपथ, सायकल ट्रॅकला मोठ्या प्रमाणात जागा सोडल्या आहेत. ही जागा सुमारे तीन ते साडेतीन मीटरपर्यंत असल्याने आधीच हे रस्ते प्रत्यक्षात असलेली वाहतूक पाहता अरुंद होते. त्यातच पुन्हा मेट्रोने रस्त्याच्या मधोमध मेट्रोमार्गाचे खांब घेतल्याने रस्त्याची जागा आणखी कमी झाली. यामध्ये रस्त्याच्या भागाचा मोठ्या प्रमाणात वापर केल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे.

मेट्रोच्या कामासाठी पदपथ उखडल्यानंतर ते पूर्ववत करून देण्याची जबाबदारी मेट्रो प्रशासनावर आहे. आरटीओ कार्यालयासमोर असलेल्या मंगळवार पेठ मेट्रो स्थानकाचे काम करीत असताना तेथील पदपथ उखडण्यात आला. त्यानंतर मेट्रोने रुबी हॉल क्लिनिक ते आरटीओ कार्यालय यादरम्यान पदपथ तयार केला आहे. या पदपथाची रुंदी रस्त्यापेक्षा मोठी असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. याबाबतचे वृत्त दैनिक ‘पुढारी’ने मंगळवारी प्रसिद्ध केले. या वृत्तानंतर महापालिकेने जास्त रुंदी असलेल्या पदपथांची नागरिकांच्या मागणीनुसार रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कामाची सुरुवात बुधवारी आरटीओ कार्यालयासमोरील रस्त्यावर तसेच बाणेर रस्त्यावर करण्यात आली.

जास्त रुंदी असलेल्या पदपथांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेत ज्या भागात सातत्याने वाहतूक कोंडी होते तसेच पदपथ 3 मीटरपर्यंत अथवा त्यापेक्षा अधिक आहेत, त्या ठिकाणचे पदपथ 1.8 मीटर करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलेला आहे.

                   – विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

 

Back to top button