

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुणे बाजार समितीचे सेसद्वारे उत्पन्न वाढण्याची परंपरा या वर्षीही सुरू आहे. 2021-22 मध्ये 51 कोटी 70 लाख 87 हजार 516 रुपये उत्पन्न झाले होते. त्यामध्ये 79 लाख 35 हजार 468 रुपयांनी वाढ होऊन यंदा 2022-23 मध्ये 52 कोटी 50 लाख 22 हजार 984 रुपये उत्पन्न नोंदविले गेले आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत 3 कोटी 3 लाख 50 हजार क्विंटल कांद्याची कमी आवक झाली आहे. मागील वर्षी कांद्याचा सरासरी भाव 20 रुपयांपेक्षा जास्त होता. या वर्षी तो दहा रुपयांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे कांद्यातून सेसद्वारे मिळणारे उत्पन्न घटले आहे. बटाटा 1 लाख 50 हजार क्विंटल कमी आवक झाली आहे. डाळिंबाचीही आवक घटली आहे. 58 हजार क्विंटल कमी आवक झाली आहे. बाजार समितीच्या या उत्पन्नामध्ये गुळ भुसार विभागात सर्वाधिक उत्पन्न वाढले आहे.
लसणाचे बाजारभाव गेल्या वर्षी जास्त होते. या वर्षी निम्म्याने कमी होत आहेत. या कारणांमुळे फळ आणि तरकारी विभागातील सेस कमी झाला आहे. केळी बाजारातील उत्पन्न 2 लाख 6 हजार 831 रुपये कमी आहे. लम्पी संसर्ग त्वचा आजारामुळे जनावरांचा बाजार चार महिने बंद होता. परिणामी, येथील उत्पन्न 95 हजार रुपयांनी घटले आहे. उत्तमनगर उपबाजाराचे 7 हजार 320 रुपये, बाह्य बाजार शुल्काचे 84 लाख 96 हजार 415 रुपयांनी उत्पन्न घटले आहे.
बाजार/विभाग वाढ/घट
गूळ भुसार 3 कोटी 86 हजार 258
मांजरी उपबाजार 34 लाख 69 हजार 911
फुलांचा बाजार 30 लाख 25 हजार 495
'अ' भरारी पथकचे 29 लाख 3 हजार 265
पिंपरी 12 लाख 44 हजार 294
मोशी उपबाजार 3 लाख 80 हजार 561
खडकी 89 हजार 37
पान 39 हजार 801
मोशी गुरांचा बाजार 6 हजार 96
तरकारी, फळ, 2 कोटी 45 लाख,
कांदा आणि बटाटा 3 हजार 772 रुपयांनी घट