पुणे : आरटीई प्रवेशासाठी 94 हजार जणांना एसएमएस | पुढारी

पुणे : आरटीई प्रवेशासाठी 94 हजार जणांना एसएमएस

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) 25 टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठी बुधवारी 94 हजार 700 पालकांना एसएमएस पाठविण्यात आले. शाळा मिळालेल्या पालकांनी कागदपत्रांची पडताळणी करून शाळेत प्रत्यक्ष प्रवेश घ्यायचा आहे. पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 15 हजार 501 पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. पुण्यात 15 हजार 596 जागांसाठी 77 हजार 531 अर्ज आले आहेत. त्यामुळे प्रवेशासाठी चांगलीच चुरस राहणार आहे.

यापाठोपाठ ठाणे जिल्ह्यात 10 हजार 996 पालकांना एसएमएस पाठविण्यात आले आहेत. आरटीईअंतर्गत राज्यभरातील 1 लाख 1 हजार 846 जागांसाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन काही शाळांमध्ये प्रत्यक्ष जागांच्या तुलनेत अर्ज जास्त, तर काही शाळांमध्ये जागांच्या तुलनेत अर्ज कमी आल्याची माहिती प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली. निवड यादीत नाव आलेल्या पालकांनी गुरुवारी दि. 13 ते दि. 25 एप्रिलपर्यंत महानगरपालिका, पंचायत समिती स्तरावरील पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी. यानंतर दि. 30 एप्रिलपर्यंत प्रत्यक्ष शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत.

Back to top button