पुणे : पुढारी वृत्तसेवा : मोठ्या कढईत एक-एक करून पदार्थ टाकत काही वेळांतच प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसहभागातून तब्बल पाच हजार किलोची मिसळ मंगळवारी तयार करण्यात आली आणि या मएकताफ मिसळचा आस्वाद गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे अभिवादनासाठी आलेल्या शेकडो नागरिकांनी घेतला. निमित्त होते क्रांतिसूर्य महात्मा फुले यांच्या जयंतीचे. क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शेफ विष्णू मनोहर यांनी ही मिसळ तयार केली.
मंगळवारी पहाटे तीनपासून मिसळ करण्याकरिता तयारी सुरू झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सकाळी सहा वाजता भव्य अशा कढईमध्ये सर्व पदार्थ आणि मसाले घालून ज्योत पेटविण्यात आली. त्यानंतर सकाळी सात वाजता संपूर्ण मिसळ तयार झाली. महात्मा फुले वाडा येथे अभिवादनाकरिता आलेल्या सर्व नागरिकांना मिसळ वाटप करण्यात आली. उपक्रमाकरिता रवी चौधरी, प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, सारंग सराफ, बाळासाहेब अमराळे, विलास कसबे, विजय कुंभार, शिरीष मोहिते आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनीही 14 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे पाच हजार किलो मिसळ तयार करून अभिवादनाकरिता येणार्यांना वाटण्यात येणार आहे.
तब्बल 500 किलो मटकी, तर 300 किलो कांदा
उपक्रमामध्ये 5 हजार किलो मिसळ बनविण्यासाठी मटकी 500 किलो, कांदा 300 किलो, आलं 100 किलो, लसूण 100 किलो, तेल 350 किलो, मिसळ मसाला 130 किलो, लाल मिरची पावडर 25 किलो, हळद पावडर 25 किलो, मीठ 20 किलो, खोबरा कीस 70 किलो, तमाल पत्र 5 किलो, फरसाण 1200 किलो, पाणी 4000 लिटर, कोथिंबीर 50 जुडी इत्यादी साहित्य वापरण्यात आले.