बावधन : पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौकामध्ये होत असलेल्या नवीन उड्डाणपुलावर, तसेच त्या खालून जाणार्या भुयारी मार्गातील भिंतींवर पुणे, मुळशीसह महाराष्ट्राचे सांस्कृतिक दर्शन घडविणारी विविध रेखाचित्रे रेखाटण्यात आली आहेत.
भारताने पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राइक'चे रेखाटण्यात येत असलेले चित्र सर्वांना आकर्षित करीत आहे.
चांदणी चौकामधील खिंड परिसर सध्या विविध रंगांच्या छटांनी नटला आहे. रस्त्यावरून प्रवास करणार्या हजारो नागरिकांना ही चित्रे भुरळ घालीत आहेत. पुण्याच्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात अग्रेसर असलेल्या हिंजवडी आयटी पार्कचे उत्तम चित्र या ठिकाणी रेखाटण्यात आले आहे. खंडाळा येथील बोगदा आणि फेसाळणार्या धबधब्याचे चित्रही या चितरले आहे. मुंबई येथील गेट वे ऑफ इंडिया आणि पंचतारांकित ताज हॉटेलचे चित्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
मुळा नदीवरील पुलाचे चित्र विविध रंगांच्या छटांनी रेखाटले आहे. मुंबई येथील बांद्रा-वरळी लिंक पुलाचे चित्र, तर परिसराच्या सौंदर्यात भर घालतो. मुंबईतील डबेवाल्यांचे चित्रही आकर्षक आहे. त्याचेच बाजूला मासे विकत बसलेली आजीचे चित्रही अप्रतिम आहे. समुद्रकिनारावरील बोटीची प्रतिमाही छान आहे. पुण्यातील लोकलच्या सहा डब्यांचे चित्रही अप्रतिम आहे.