पदोन्नतीमुळे 69 कृषी अधीक्षक विराजमान ; कृषी उपसंचालकांच्या बढत्यांवर शिक्कामोर्तब | पुढारी

पदोन्नतीमुळे 69 कृषी अधीक्षक विराजमान ; कृषी उपसंचालकांच्या बढत्यांवर शिक्कामोर्तब

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  राज्य सरकारने कृषी विभागातील रखडलेल्या उपसंचालकांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी पदोन्नत्या केल्या असून, एकूण 69 अधिकारी अधीक्षक कृषी अधिकारी पदावर विराजमान झाले आहेत. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेल्या पदोन्नत्यांचा विषय मार्गी लागला आहे. पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदी संजय काचोळे यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

राज्यातील कृषी उपसंचालकांच्या एकूण 84 पदोन्नत्यांचा विषय मंत्रालयात धूळ खात पडल्याच्या विषयास दै. ‘पुढारी’ने वाचा फोडली होती. आता शासनाने नुकतीच 69 कृषी उपसंचालकांचा पदोन्नती दिली आहे. तसेच शासनाने यापूर्वी सेवानिवृत्ती दिवशी 10 अधिकार्‍यांना पदोन्नती दिलेली आहे. पुणे विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील रिक्त असलेल्या अधीक्षक कृषी अधिकारीपदी सुरेश भालेराव, पुण्यातील कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या (रामेती) प्राचार्यपदी अनिल देशमुख यांची नियुक्ती झाली आहे.

कृषी आयुक्तालयातील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारीपदी प्रवीण देशमुख, कृषी गणनेच्या उपायुक्तपदी दयानंद जाधव आणि कृषीच्या मुख्य सांख्यिकीपदी धनवंतराव पाटील यांची नियुक्ती झाली आहे. पुण्यातील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाच्या प्रकल्प व्यवस्थापकपदी सुधाकर बोराळे, पल्लवी कोंढाळकर-देवरे, तर पुण्यातील कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेच्या (आत्मा) प्रकल्प संचालकपदी विजय हिरेमठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्मार्ट प्रकल्पात 6 अधिकारी नियुक्त…
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीपदावरील 6 अधिकार्‍यांची स्मार्ट प्रकल्प कार्यालयात विविध पदांवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये स्मार्टच्या धोरण विश्लेषकपदी हरी बापतीवाले, कृषी तंत्रज्ञान क्षमता बांधणी तज्ज्ञपदी अरुण कांबळे, निविष्ठा व गुणनियंत्रण तंत्रज्ञान तज्ज्ञपदी अशोक बाणखेले, अन्नप्रक्रिया व्यवस्थापन तज्ज्ञपदी वैभव तांबे, मनुष्यबळ विकास व क्षमताबांधणी तज्ज्ञपदी सर्जेराव तळेकर, कृषी निर्यात व काढणीपश्चात तंत्रज्ञान व्यवस्थापन तज्ज्ञपदी माणिक र्त्यंबके यांची नियुक्ती झाली आहे.

Back to top button