निओ मेट्रोच्या डीपीआरनुसार होणार पाहणी | पुढारी

निओ मेट्रोच्या डीपीआरनुसार होणार पाहणी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  बहुचर्चित उच्चतम क्षमता द्रुतगती मार्ग (एचसीएमटीआर) प्रकल्पाच्या ऐवजी त्याच मार्गावरून निओ मेट्रो प्रकल्प करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. महामेट्रो कंपनीने निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करून महापालिकेला सादर केला आहे. त्यानंतर आता महापालिकेचे अधिकारी जागेवर जाऊन नियोजित मार्गाची पाहणी करणार आहेत, यामुळे प्रकल्पाच्या कामाला गती मिळणार आहे. शहरातील खासगी वाहनांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने सुमारे 36 कि.मी. लांबीच्या एचसीएमटीआर या एलिव्हेटेड वर्तुळाकार मार्गाचे नियोजन केले होते. या प्रकल्पावर 1986 पासून केवळ चर्चाच झाली. सुरुवातीस हा प्रकल्प केवळ पीएपी बससाठीच करण्याचे नियोजन होते. त्यानंतर त्यात बदल करून खासगी वाहनांनाही प्रवेश देण्याचा निर्णय मुख्य सभेत घेण्यात आला.

या प्रकल्पासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून 5 हजार 192 कोटी रुपयांच्या निविदा मागविण्यात आल्या. आलेल्या निविदा सुमारे 45 ते 50 टक्के अधिक दराने आल्याने निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली. दरम्यानच्या काळात तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांसाठी एकाच प्रकारचा मार्ग किंवा निओ मेट्रोचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही पुणे व पिंपरी-चिंचवड शहरासाठी एकात्मक पद्धतीने निओ मेट्रो आवश्यक असून, त्यासाठी केंद्राची मदत मिळेल, असेही म्हटले होते.

त्यानुसार महापालिकेने महामेट्रोला निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करण्यास सांगितले होते. महामेट्रो ने 44 कि.मी. चा निओ मेट्रोचा प्रकल्प आराखडा तयार करून तो महापालिकेला सुपूर्त केला आहे. ‘एचसीएमटीआर’ मार्गाची आखणी केलेल्या मार्गावरच निओ मेट्रो प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पासाठी आता वित्त विभाग, भूसंपादन विभाग, डीपी विभाग, पथ विभाग आदींचा अभिप्राय घेतला जाणार आहे. तर दुसरीकडे निओ मेट्रोच्या डीपीआरमध्ये नमूद केलेल्या मार्गाची प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रशासनाकडून पाहणी केली जाणार आहे.

प्रस्तावित मेट्रो मार्गाला आठ ठिकाणी जोड
निओ मेट्रो प्रकल्प अस्तित्वात असलेल्या मेट्रो मार्ग आणि प्रस्तावित मेट्रो मार्गाला आठ ठिकाणी जोडला जात आहे. बोपोडीपासून सुरू होणारा मार्ग विद्यापीठ चौक, सेनापती बापट रोड, कोथरूड, एरंडवणे, म्हात्रे पूल, सिंहगड रस्ता, सारसबाग, स्वारगेट, सातारा रोड, बिबवेवाडी, कोंढवा-एन आयबीएम रोड, वानवडी, एम्प्रेस गार्डन, मुंढवा, विमाननगर, विश्रांतवाडी, येरवडा, खडकी बाजार आदी भागांतून जाईल.

Back to top button