प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता कॉलेजस्तरावरच | पुढारी

प्रथम, द्वितीय वर्षाच्या परीक्षा आता कॉलेजस्तरावरच

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमधील बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्ष वगळता प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षांचे नियोजन कॉलेजस्तरावरच करण्यात येणार आहे. यासंदर्भात अंतिम निर्णय घेण्यासाठी बुधवारी (दि.12) बैठक घेण्यात येणार असून परीक्षांसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा बिगरव्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सध्या कॉलेजस्तरावर होतात. मात्र, इतर वर्षांच्या परीक्षांची जबाबदारी विद्यापीठावर आहे. त्यामुळे परीक्षांचे नियोजन आणि परीक्षा झाल्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीत मोठा कालावधी जातो, त्यामुळे निकालांना उशीर होतो. त्यातच कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष पाच महिन्यांनी मागे पडले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून करणे शक्य नाही.

या पार्श्वभूमीवर आगामी सत्र परीक्षांचे नियोजन वेळेत करण्यासाठी अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर आणि डॉ. विजय खरे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा कॉलेजस्तरावर देण्याबाबत चाचपणी करण्यात येत आहे. त्यामुळे केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षाच विद्यापीठाकडून होतील. याबाबतचा अहवाल समितीकडून विद्यापीठाला देण्यात येणार आहे. त्यानंतर परीक्षा मंडळाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. विद्यापीठाकडून प्रश्नपत्रिका तयार करून, त्या कॉलेजला पाठविण्यात येतील. लेखी परीक्षांचे संपूर्ण नियोजन कॉलेजस्तरावर होईल. उत्तरपत्रिकांची तपासणीही कॉलेजमध्ये होऊन गुण विद्यापीठाला पाठविण्यात येतील. त्यानंतर विद्यापीठाकडून निकाल प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

परीक्षांचे नियोजन कॉलेजस्तरावरच करण्यासंदर्भात दोन समित्या नेमण्यात आल्या आहेत. त्यांची बुधवारी बैठक होणार आहे. त्या वेळी त्यांना परीक्षांसंदर्भातील सद्य:स्थिती सांगण्यात येईल. शैक्षणिक वर्ष जर 1 ऑगस्टला सुरू करायचे असेल आणि निकाल वेळेवर लावयचे असतील तर परीक्षांचे विकेंद्रीकरण करून प्रथम आणि व्दितीय वर्षाच्या परीक्षा महाविद्यालयांकडेच सोपविणे योग्य होणार आहे.
– डॉ. महेश काकडे, संचालक, परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

Back to top button