18 विद्या, 64 कलांना आता श्रेयांक देण्याची मुभा | पुढारी

18 विद्या, 64 कलांना आता श्रेयांक देण्याची मुभा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : कला, क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांना श्रेयांक देण्याची मुभा मिळाली आहे. तसेच, भारतीय ज्ञान प्रणालीतील 18 विद्या आणि 64 कलांमध्ये समावेश असलेल्या घटकांसाठीही आता श्रेयांक देता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) राष्ट्रीय श्रेयांक आराखड्याचा अंतिम मसुदा नुकताच प्रसिद्ध केला. या आराखड्यात शालेय शिक्षणापासून विद्यापीठीय शिक्षणापर्यंत श्रेयांक पद्धतीचा समावेश करण्यासह मुख्य प्रवाहातील शिक्षण व्यावसायिक कौशल्याशी जोडण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच, या आराखड्याच्या अंमलबजावणी- साठीच्या आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश यूजीसीने शिक्षण संस्थांना दिले. ऑक्टोबरमध्ये जाहीर करण्यात आलेल्या मसुद्यात भारतीय ज्ञानप्रणालीचा समावेश नव्हता. तो अंतिम मसुद्यात करण्यात आला आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक आराखड्यांतर्गत पूर्वप्राथमिक स्तरापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत विद्यार्थ्यांना श्रेयांक प्राप्त करता येतील. आठशे तासांसाठी 27 श्रेयांक, एक हजार तासांसाठी 33 श्रेयांक या पद्धतीने श्रेयांकांची रचना करण्यात आली आहे. उदाहरणार्थ पूर्वप्राथमिक ते दुसरीच्या विद्यार्थ्यांना आठशे तास पूर्ण केल्यावर 27 श्रेयांक, तिसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना एक हजार तास पूर्ण केल्यावर 33 श्रेयांक, तर सहावी ते पीएच. डी. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात बाराशे तास पूर्ण केल्यावर चाळीस श्रेयांक मिळतील. शालेय पातळीवर पाचवी ते बारावीसाठी प्रत्येक विषयाला 240 तास स्वअध्ययनासाठी असतील. वर्गातील मूल्यमापन, प्रयोगशाळेतील प्रात्यक्षिके, प्रकल्प, गृहपाठ यांसाठी मिळविलेल्या श्रेयांकांवरून एकूण अध्ययनाचे तास मोजले जातील. वर्गातील अध्ययनाच्या पलीकडे क्रीडा, योग, शारीरिक उपक्रम, सादरीकरण, हस्तकला आदींचा मूल्यमापन आराखड्यात समावेश असेल, असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

गिफ्टेड विद्यार्थ्यांचे मूल्यमापन…
गिफ्टेड विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांचा विचारही या आराखड्यात करण्यात आला आहे. त्यादृष्टीने सीबीएसई, एनआयओएस, राज्य मंडळे, यूजीसी, एआयसीटीई, एनसीव्हीटीई आदींनी गिफ्टेड विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनाच्या विशेष पद्धती विकसित कराव्यात, असेही नमूद करण्यात आले आहे.

Back to top button