बारामती: जनाई- शिरसाई योजनेतून कोट्यानुसार पाणी वाटप करा; भाजप नेते दिलीप खैरे यांची मागणी | पुढारी

बारामती: जनाई- शिरसाई योजनेतून कोट्यानुसार पाणी वाटप करा; भाजप नेते दिलीप खैरे यांची मागणी

बारामती, पुढारी वृत्तसेवा: बारामतीसह दौंड, पुरंदर तालुक्यांतील दुष्काळी भागातील शेतीच्या सिंचनासाठी राबविण्यात आलेल्या जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजनेच्या पाण्याचे मंजूर कोट्यानुसार वाटप करावे, अशी मागणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी केली. यासंदर्भात खैरे यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना निवेदन दिले.

खडकवासला धरणसाखळीमधून दौंड, बारामती व पुरंदर तालुक्यातील शेतीसिंचनासाठी जनाई-शिरसाई उपसा सिंचन योजना करण्यात आलेली आहे. ही योजना 20 वर्षांपेक्षा अधिक काळ सुरू असतानाही वीजबिल, इतर खर्च आदी कारणांमुळे या भागातील शेतकर्‍यांना हक्काचे पाणी घेता येत नव्हते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने 81-19 या धोरणाप्रमाणे पाणीपट्टी आकारण्याचा निर्णय केला. त्यानंतर या भागातील शेतकरी नियमित पाणीपट्टीचे पैसे भरत आहेत.

सन 2019 च्या आधी कालव्यातून या योजनेसाठी पाण्याचे नियोजन होत होते. परंतु, महाविकास आघाडी सरकारच्या काळात ही पद्धत बंद केली आणि योजनेला आवश्यक पाणी न मिळाल्याने वितरण विस्कळीत झाले. वरवंड तलावाची साठवणक्षमता, मंजूर कोटा, याचा विचार न करता ’टेल टू हेड’चे कारण पुढे करून राजकीय दडपणाखाली शेतकर्‍यांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे. शिवाय, तत्कालीन सरकारने योजनेचे वीजबिल वाढविल्याने पाणी दरवाढ झाली. त्याचाही फटका शेतकर्‍यांना बसला, असा आरोप खैरे यांनी केला.

योजनेच्या मंजूर कोट्यानुसार पाणी देण्याची आवश्यकता आहे. वरवंड तलावाची साठवणक्षमता कमी असल्याने नियमित आवर्तन सुरू करण्याआधी या योजनेच्या कोट्यातील पाणी उपलब्ध करून द्यावे. अनेक वर्षे या भागाच्या वाट्याचे पाणी इतरत्र वळवून येथील शेतकर्‍यांवर अन्यायच केलेला आहे. तो यापुढे होऊ नये, यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणीही खैरे यांनी केली आहे.

Back to top button