पुणे: गुटख्यावरील बंदी केवळ कागदावरच! दोन महिन्यांत जप्त केला 2 कोटींचा गुटखा

पुणे: गुटख्यावरील बंदी केवळ कागदावरच! दोन महिन्यांत जप्त केला 2 कोटींचा गुटखा

मनोज आवाळे

पुणे : राज्य सरकारने 11 वर्षांपूर्वी गुटखा बंदी लागू केली. परंतु, या कायद्याची अंमलबजावणी परिणामकारक होत नसल्याचे दिसून येत आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. गुटखा बंदीची परिणामकारक अंमलबजावणी करण्यात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिस यंत्रणा कमी पडल्यामुळे खुलेआम गुटख्याची विक्री होत आहे. त्यामुळे ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यात जरी गुटखा बंदी असली, तरी शेजारील कर्नाटक तसेच इतर राज्यांत मात्र गुटख्यावर बंदी घालण्यात आलेली नाही. त्यामुळे या राज्यातून मोठ्याप्रमाणात गुटखा प्रवासी तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनातून आणला जातो. पोलिसांनी केलेल्या कारवाईतून हे स्पष्ट झाले आहे.

पुणे-बंगळुरू, पुणे-सोलापूर तसेच पुणे-नाशिक महामार्गाने गुटख्याची वाहतूक मोठ्याप्रमाणात होते. विशेषत: चाकण, भिगवण, इंदापूर, खेड शिवापूर परिसरात गुटख्याची वाहतूक व साठवणूक होत असल्याचे पोलिसांनी तसेच अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी चाकण, खेड शिवापूर, इंदापूर तसेच भिगवण परिसरात कारवाई करून सुमारे दोन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलिसांची कारवाई होत असली, तरीही गुटख्याची विक्री होतच आहे. गुटख्याचे होणारे दुष्परिणाम पाहता कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.

जप्त केलेला गुटखा
चाकण- 93 लाख
खेड-शिवापूर- 55 लाख
भिगवण- 34 लाख
इंदापूर- 18 लाख
भोर- 2 लाख

कर्नाटकातील विजापूर, निपाणी तसेच इतर राज्यांतून गुटखा आणला जातो. पुणे-सोलापूर महामार्ग त्यांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा मार्ग आहे. गुटखा कोठून आणला जातो, कुठे विकला जातो याबाबत कसून तपास सुरू आहे. यातील आरोपींना शोधण्यासाठी तांत्रिक तपासही केला जात आहे. गुटखा विक्रीतील जे आरोपी सापडले आहेत, त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासली जात आहे. संबंधितांवर प्रसंगी मोक्काची कारवाई केली जाईल.
गणेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी, बारामती.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news