वडगाव मावळ : भाजपवाले नव्हे, आपलेच गद्दार आपल्याला पाडतात : आ. सुनील शेळके | पुढारी

वडगाव मावळ : भाजपवाले नव्हे, आपलेच गद्दार आपल्याला पाडतात : आ. सुनील शेळके

वडगाव मावळ : गेल्या तीन चार महिन्यांत काही सहकारी संस्था, सोसायट्या व ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादीला मिळालेल्या धक्क्याचे उदाहरण देत आम्ही बोलत नाही, कारवाई करत नाही याचा अर्थ तुम्ही कसही वागावं असाच झाला आहे. भाजप आपला पराभव करत नाही आपल्या माणसाला आपलेच गद्दार पडतात. त्यामुळे कोअर कमिटीचा निर्णय मान्य होत नसेल तर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत तुम्हीच पॅनल द्या, अशी सूचना आमदार सुनील शेळके यांनी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांना केली.

मावळ तालुका राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात आमदार शेळके बोलत होते. या वेळी ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे, बबनराव भेगडे, गणेश ढोरे, विठ्ठलराव शिंदे, सुभाषराव जाधव, अशोक घारे, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, नगराध्यक्ष मयूर ढोरे, दीपक हुलावळे, साहेबराव कारके, नामदेव दाभाडे, चंद्रकांत दाभाडे, महिलाध्यक्षा दीपाली गराडे, युवक अध्यक्ष किशोर सातकर, संदीप आंद्रे उपस्थित होते.

18 जणांना संधी मिळणार
बापूसाहेब भेगडे म्हणाले, की आपल्या चढाओढीत आपला पराभव होतो. संघटित होऊन लढले तर निश्चित यश मिळते. बाजार समिती निवडणुकीत 82 जणांचे अर्ज आहेत संधी मात्र 18 जणांना मिळणार आहे. त्यामुळे एकत्र येऊन योग्य निर्णय घ्या व संघटित होऊन निवडणूक जिंका.

इच्छुकांनी पक्षाचा निर्णय मान्य करावा
बबनराव भेगडे यांनी बाजार समितीच्या स्थापनेपासून आढावा मांडत बाजार समितीची सद्यस्थिती व महत्त्व याविषयी माहिती दिली. इच्छुकांनी पक्षाचा निर्णय मान्य करून निवडणुकीला सामोरे जावे, असे आवाहन केले. गणेश खांडगे यांनी पक्षाची कोअर कमिटी सर्व इच्छुकांच्या मुलाखती घेणार असल्याचे सांगून कोअर कमिटी देईल त्या उमेदवारांना विजयी करण्याचा संकल्प व्यक्त केला. नगरसेवक चंद्रजित वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले.

गद्दारीमुळे सत्ता गेली
आमदार शेळके म्हणाले, की खरेदी-विक्री संघात राष्ट्रवादीचे दुप्पट संख्याबळ असताना भाजपचे चेअरमन झाले. खादी ग्रामोद्योग संघातही तसेच घडले, परंदवडी व अजीवली ग्रामपंचायतमध्ये ज्याचे ऐकले त्यानेच भाजपचा सरपंच केला, साळुंब—े व शिवली सोसायटी तसेच भोयरे ग्रामपंचायतमध्ये आपल्यांनीच गद्दारी केल्यामुळे सत्ता गेली. गेल्या सहा महिन्यांत झालेला हा पराभव भाजपमुळे नाही तर, आपल्यातील गद्दारांमुळे झाला आहे. त्यामुळे या निवडणुकीत गद्दारी थांबवायची असेल तर तुम्हीच पॅनल द्या, आपण आपल्या ताकदीने निवडणूक जिंकू, असा विश्वास आमदार शेळके यांनी व्यक्त केला.

Back to top button