‘आरटीई’च्या यादीची पालकांना प्रतीक्षा; सोडत झाली तरी यादी जाहीर नाही | पुढारी

‘आरटीई’च्या यादीची पालकांना प्रतीक्षा; सोडत झाली तरी यादी जाहीर नाही

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : आरटीई प्रवेशअंतर्गत दरवर्षी ऑनलाईन लॉटरीची सोडत झाल्यानंतर लगेच निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाते. मात्र, यंदा ही यादी करण्याचे काम सात दिवस लांबले आहे. त्यामुळे हा उशीर का होत आहे, याची चर्चा सुरू असून पालकांना यादीची प्रतीक्षा लागली आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी आरटीईची ऑनलाईन पद्धतीने 5 एप्रिल रोजी लॉटरीची सोडत जाहीर करण्यात आली आहे. मात्र, सात दिवसांनंतर विद्यार्थ्यांची नावे जाहीर करण्यात येणार असल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. निकाल जाहीर करण्यासाठी सात दिवसांचा अवधी कशाला, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

आरटीई प्रवेशाची यादी जाहीर होण्यास पालकांना आणि विद्यार्थ्यांना आता 12 एप्रिलची वाट पहावी लागणार आहे. त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होईल, असे शिक्षण विभाग सांगत आहे. ऑनलाईन पद्धतीने लॉटरीची सोडत झाली असूनही संदेश येण्यासाठी सात दिवस उशीर का लागत आहे, या बाबत पालकांमध्ये संभ—म आहे. ही प्रक्रिया वेळखाऊ होत चालल्याने पालकांमधून संतापही व्यक्त केला जात आहे.

ऑनलाइन पद्धतीने लॉटरी काढण्यात आल्यानंतर सर्व पालकांना अपेक्षा होती की, लगेच निवड आणि प्रतीक्षा यादी जाहीर होईल. परंतु, तसे न करता ही यादी आणि त्याचे संदेश (एसएमएस) 12 एप्रिलनंतर दुपारी चारनंतर जाहीर करण्यात येणार, अशी माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली. निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासन आठ दिवसांची वाट का पाहतेय, असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत. प्रवेशाचे काम त्वरित करावे, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

दरवर्षी यादी जाहीर झाल्याच्या दिवशीच पालकांना मेसेज जातात. यावर्षी अद्याप यादी जाहीर झाली नाही. उशीर करण्याचे कारणही समजत नाही. तसेच पोर्टलवर काहीच दिसत नाही. सोडत काढून पाच ते सहा दिवस झाले. आता पालकांना 12 एप्रिलपर्यंतची वाट पहावी लागणार आहे.

                                      -शरण शिंगे उपाध्यक्ष, आरटीई पालक संघ

Back to top button