लोणी काळभोर : कर्मचाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाचे नाविन्य जपले पाहीजे : अनिल माने | पुढारी

लोणी काळभोर : कर्मचाऱ्यांनी भूमिअभिलेख विभागाचे नाविन्य जपले पाहीजे : अनिल माने

लोणी काळभोर; पुढारी वृत्तसेवा : प्रत्येक कर्मचाऱ्याने भूमी अभिलेख विभागाचे नाविन्य जपले पाहिजे आणि काळाप्रमाणे आपल्यातही बदल केला पाहिजे असे मत भुमि अभिलेखचे पुणे प्रादेशिक उपसंचालक अनिल माने यांनी व्यक्त केले. 10 एप्रिल हा दिवस राष्ट्रीय भूमापन दिन म्हणून संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरा केला जातो. 10 एप्रिल 1802 रोजी संपूर्ण देशात मोजणी म्हणजेच भू मापनाची सुरुवात झाली म्हणून हा दिवस भूमापन दिन म्हणून साजरा केला जातो. पुणे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे या निमित्ताने कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना अनिल माने बोलत होते.  याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपसंचालक भूमी अभिलेख (भूमापन)कमलाकर हट्टेकर, डॉ. श्रीधर लिमये, हास्य सम्राट मधुकर टिल्लू, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख  सूर्यकांत मोरे, राजपत्रित संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा नगर भूमापन अधिकारी क्रमांक 1 संजय कुंभार, कर्मचारी संघटनेचे सदानंद मोर्डे आणि शिवप्रसाद कोरे यासह सर्व उपअधीक्षक  आणि भूमी अभिलेख कर्मचारी उपस्थित होते. या प्रसंगी प्रत्येक तालुक्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आदर्श कर्मचारी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आल तसेच उपअधीक्षक भूमी अभिलेख मुळशी या कार्यालयाला यंदाचा आदर्श कार्यालय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम प्रसंगी अनिल माने, कमलाकर हट्टेकर, सूर्यकांत मोरे आणि संजय कुंभार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संयोजक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख पुणे सूर्यकांत मोरे यांनी आम्ही प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत असा आशावाद व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास गोफणे यांनी तर आभार उमेश झेंडे यांनी मानले. सूत्रसंचालन गणेश ठोकळ आणि कविता गौड यांनी केले.

Back to top button