पुणे : विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा चुरस ! | पुढारी

पुणे : विधी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी यंदा चुरस !

पुणे; पुढारी वृत्तसेवा : विधी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍यांसाठी आता अमर्याद संधी निर्माण झाल्या आहेत. परिणामी, कायद्याचे शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. यंदा 17 हजारांच्या आसपास जागा असलेल्या तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी तब्बल 72 हजार 925 विद्यार्थ्यांनी, तर पाच वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या सीईटीसाठी 22 हजार 526 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. जागांपेक्षा अर्ज जास्त आल्यामुळे यंदा प्रवेशासाठी चुरस वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वेगवेगळ्या क्षेत्रांत आता कायद्याचा अभ्यास केलेली व्यक्ती गरजेची असते. त्यामुळे विधी क्षेत्राचा विस्तार वाढत असून, विधीच्या विद्यार्थ्यांची मागणीही दिवसागणिक वाढत आहे. बहुतांश विद्यार्थी कायद्याचे ज्ञान मिळावे, या उद्देशाने जोड शिक्षण म्हणूनही विधी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. शिवाय, या क्षेत्रातील विविध करिअरच्या संधींविषयी माहिती मिळाल्यामुळे विधी अभ्यासक्रमांना गेल्या काही वर्षांपासून प्रवेश घेण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

कायदा ही दैनंदिन जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट असल्यामुळे प्रत्येकाला कायद्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयक जागरूकता आणि विधीक्षेत्रातील करिअर संधींविषयी आकर्षण निर्माण झाले आहे. काही वर्षांपूर्वी विधी हे क्षेत्र सरकारी कामकाजापुरते मर्यादित होते. पण, आता राज्यात विविध कंपन्यांमध्ये विधी विभाग स्थापन करण्यात आल्यामुळे नोकरीच्या असंख्य संधी निर्माण झाल्या आहेत. पदवी अभ्यासक्रम हा तीन वर्षे (पदवीनंतर), तसेच पाच वर्षे (बारावीनंतर) अशा दोन स्वरूपात घेतला जातो. विधी पाच वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी 20 एप्रिलला, तर विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी 2 आणि 3 मे रोजी होणार आहे.

Back to top button