राज्यातील साखर उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला | पुढारी

राज्यातील साखर उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्यात सुरू असलेल्या ऊस गाळप हंगामात 205 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली असून, उर्वरित 5 कारखानेही आठवडाभरात बंद होतील. हंगामाच्या सुरुवातीस 130 लाख टनाइतका वर्तविण्यात आलेला साखर उत्पादनाचा अंदाज यंदाही चुकल्याचे स्पष्ट झाले असून, 106 लाख टन उत्पादन हाती येण्याचा सुधारित अंदाज साखर आयुक्तालयाने केंद्र सरकारला कळविला आहे. राज्यात सुरू असलेल्या कारखान्यांमध्ये सिद्धेश्वर (सोलापूर), नॅचरल शुगर (उस्मानाबाद), समर्थ युनिट 2 (जालना), सुंदरराव सोळंके (बीड) आणि अजिंक्यतारा (सातारा) या 5 साखर कारखान्यांचा समावेश आहे.

तर सद्यस्थितीत 10 कोटी 51 लाख टनांइतके ऊस गाळप पूर्ण होऊन 9.98 टक्के सरासरी उतार्‍यानुसार सुमारे 105 लाख टनाइतके साखर उत्पादन हाती आले आहे. गतवर्षी याच काळात 11.87 कोटी टन ऊस गाळपातून सरासरी 10.42 टक्के उतार्‍यानुसार 123 लाख टनांइतके साखर उत्पादन तयार झाले होते. यावरूनच साखर उत्पादन घटण्याची तुलनात्मक स्थितीही लक्षात येत आहे.

दरम्यान, 15 मार्चच्या अहवालानुसार ऊस तोडणी वाहतूक खर्च वजा जाता उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची 24 हजार 469 कोटी रुपयांपैकी शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर 23 हजार 116 कोटी रुपये (95 टक्के) जमा करण्यात आल्याचे साखर आयुक्तालयातून सांगण्यात आले. तर 210 पैकी 84 कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपीची रक्कम दिली आहे. बदलत्या हवामानाचा ऊस पिकास बसलेला फटका, खोडवा उसाचे असलेले अधिक प्रमाण आणि उतार्‍यातील घट यामुळे साखर उत्पादनाचा अंदाज पुन्हा एकदा चुकल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्यातील साखर कारखान्यांकडून यंदाचा ऊस गाळप हंगाम बंद होण्याच्या मार्गावर असताना जवळपास उसाची 95 टक्के रक्कम शेतकर्‍यांना देण्यात आली आहे. आणखी एक आठवडाच ऊस गाळप हंगाम चालेल.

                                  – शेखर गायकवाड, साखर आयुक्त, पुणे.

Back to top button