बारामती : बेरोजगारीने ग्रामीण तरुणांपुढे जगण्याचा प्रश्न | पुढारी

बारामती : बेरोजगारीने ग्रामीण तरुणांपुढे जगण्याचा प्रश्न

बारामती; पुढारी वृत्तसेवा : वाढती बेरोजगारी, वाढलेली महागाई , हाताला नसणारे काम, यामुळे ग्रामीण भागात तरुणांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उच्चशिक्षित होऊनही तरुणांपुढे कामाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आर्थिक गणिते कोलमडली असून, नैराश्य वाढत आहे. मध्यंतरी आलेल्या कोरोनाचा परिणाम नोकर्‍यांवर झाला. कोरोनामुळे अनेक घरांतील कर्त्या व्यक्ती गेल्या. अनेकांच्या नोकर्‍या व व्यवसायाचे मोठे नुकसान झाले. महागाई प्रचंड वाढली.

शेकडो तरुण बेरोजगार झाले. यात ग्रामीण भागातील तरुणांची चांगलीच ससेहोलपट होताना दिसून येत आहे. ना नोकरी, ना शेतमालाला दर, ना व्यवसायात यश, यामुळे तरुण संघर्ष करून जीवन जगत आहेत. जनतेच्या प्रश्नांबाबत सरकारची काय प्रतिमा आणि काय योजना आहेत? याबाबत तरुण अनभिज्ञ असून, अनेकांच्या संसारांची राखरांगोळी होताना दिसत आहे.

ग्रामीण भागात पूर्वी छोटे-मोठे उद्योग सुरू होते. आता मात्र घरातील सदस्यच या व्यवसायांवर अवलंबून राहत असल्याने अन्य मजुरांना काम मिळत नाही. पतसंस्था, बँका, सोसायट्या यांची कर्जे वाढत चालली आहेत. तरुणांना शेतातदेखील काम मिळत नाही. दुधाला चांगला दर असला, तरीही चार्‍याचे वाढलेले दर, यामुळे त्यातही परवडत नसल्याचे तरुणांचे म्हणणे आहे.

महिलांचे शेतातील खुरपणीचे काम रासायनिक खतांमुळे बंद झाले; परिणामी उत्पन्न घटले. पर्यायाने आर्थकि चणचण जाणवू लागली. पेट्रोल-डिझेल, गॅस तसेच मोबाईल रिचार्जचे दर वाढल्याने आर्थकि गणित कोलमडून गेले आहे. गव्हाचे दर ढासळले असून, शेतकर्‍यांना कवडीमोल दराने गहू विकावा लागत आहे. अवकाळीने शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले असून, यातून ठोस निर्णय घेत शेतकर्‍यांना दिलासा देण्याची गरज आहे.

थकीत वीजबिलांमुळे शेतकर्‍यांच्या वीजपंपाचा वीजपुरवठा तोडला जात आहे. यातून त्यांना कोणत्याही प्रकारची सवलत मिळत नाही. पर्यायाने पाणी असूनही पिके जळून जात आहेत. अनेक सरकारी, सहकारी, खासगी कार्यालयांत विविध प्रकारच्या कंपन्या, नगरपालिका, रुग्णालये, शाळा-महाविद्यालये या ठिकाणी होणारी नोकरभरती बंद असल्यामुळे अनेक तरुणांना पात्रता असूनही संधी मिळत नाही, शिवाय अनेक खासगी कंपन्या नोकरकपात करीत आहेत.

गुन्हेगारीकडे वाटचाल
शेती, दूधधंदा यातूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याचे पाहायला मिळत आहे. रुपयाच्या वस्तूसाठी 50 रुपये मोजण्याची वेळ आली. पेट्रोलपासून खाद्यपदार्थांपर्यंत सगळ्या बाबी महाग होत आहेत. दुसरीकडे पात्रता असून आणि काम करण्याची इच्छा असूनही ग्रामीण तरुणांच्या वाट्याला बेरोजगारी आली आहे.

Back to top button