अपघातामध्ये तातडीची वैद्यकीय सेवा देणारा पहिला घटकच वंचित | पुढारी

अपघातामध्ये तातडीची वैद्यकीय सेवा देणारा पहिला घटकच वंचित

केडगाव; पुढारी वृत्तसेवा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मळद येथे शनिवारी (दि. 8) लक्झरी बसगाडीचा ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू, तर 50 प्रवासी जखमी झाले होते. या घटनेत महत्त्वाची भूमिका निभावत जखमी प्रवाशांना मदत करणारा घटक वंचित राहिला आहे. त्यांच्या पाठीवर कुणीतरी थाप दिली पाहिजे, त्यांचे कौतुक केले पाहिजे; मात्र तसे होत नाही, ही खंत त्यांच्याकडून व्यक्त होणे साहजिकच आहे.

शासनाच्या तातडीच्या सेवेतील 108 क्रमांकाची रुग्णवाहिका, त्यावरील डॉक्टर्स, चालक आणि त्यांचे मदतनीस यांचा हा विषय आहे. त्यांचा आधार रुग्णांना फार मोठा असतो. त्यांचीच कर्तबगारी वंचित राहते, हाच प्रकार मळदजवळील अपघातात घडला. या अपघातानंतर 108 क्रमाकांच्या 6 रुग्णवाहिका तातडीने धावून आल्या. दौंड, कुरकुंभ, भिगवण, मोरगाव येथून त्या आल्या होत्या. तब्बल 31 रुग्णांना त्यांच्यामुळे वैद्यकीय सेवा मिळाली.

यासाठी झोनल मॅनेजर म्हणून विठ्ठल बोडके, जिल्ह्याची व्यवस्थापक डॉ. प्रियंका जावळे या अधिकार्‍यांनी रुग्णांना वेळेवर उपचार मिळण्यास मदत केली. आपत्कालीन मेडिकल ऑफिसर म्हणून डॉ. नारायण येडे, डॉ. पद्माकर खुडे, डॉ. भरत भरणे, डॉ. संजय गायकवाड, डॉ. प्रकाश माने हे घटनास्थळी उपस्थित होते. रुग्णवाहिका चालवणारे पायलट उद्धव भगत, विनोद सुडगे, विनोद सोनवणे, सागर सकट, दत्तात्रय जगताप, अमोल बारवकर यांनी महत्त्वाची भूमिका या वेळी बजावली.

शासनाची अत्यंत तातडीची सेवा म्हणून 108 या क्रमांकाच्या रुग्णवाहिकेकडे बघितले जाते. घटनास्थळी त्या तत्काळ उपस्थित झाल्या होत्या. त्यांच्या कामकाजाबाबत कोणीतरी शाबासकी दिली पाहिजे; परिणामी तसे झाले नाही. या सर्वांचा शासनाने उत्साह वाढावा म्हणून योग्य दखल घेणे गरजेचे आहे.

Back to top button