एमएचटी सीईटीला सात लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी | पुढारी

एमएचटी सीईटीला सात लाखांवर विद्यार्थ्यांची नोंदणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी सेल) विविध प्रकारच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी नोंदणी सुरू केली होती. यातील एमएचटी सीईटी वगळता अन्य सर्व अभ्यासक्रमांची नोंदणी पूर्ण झाली आहे. एमएचटी सीईटीला यंदा 7 लाख 38 हजार 972 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी 15 एप्रिलपर्यंत संधी देण्यात आल्यामुळे एमएचटी सीईटी देणार्‍यांचा टक्का वाढणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

राज्यात उच्च व तंत्रशिक्षण, वैद्यकीय शिक्षण, आयुष, कृषी, कला संचालनालय आदी शिक्षण विभागांच्या अंतर्गत येणार्‍या विविध विषयांच्या 18 अभ्यासक्रमांच्या सीईटी परीक्षा सीईटी सेलमार्फत घेतल्या जाणार आहेत. यामधील एमएचटी सीईटी, एमबीए, एमसीए, बीएड- एमएड, बीए, बीएस्सी, बीएड या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी परीक्षा झालेली आहे. काही तांत्रिक कारणास्तव एमबीएची सीईटी पुन्हा होणार आहे. तर अद्यापही महा एएसी, विधी पाच आणि तीन वर्षे, एमपीएड, बीएड, एमएचटी सीईटी, बीपीएड, एमएड आणि बी. डिझाईन या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची सीईटी एप्रिल आणि मे महिन्यात पार पडणार आहे.

एमएचटी सीईटीसाठी यंदा 7 लाख 38 हजार 972 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी पीसीबी ग्रुपच्या 2 लाख 95 हजार 844 तर पीसीएम ग्रुपच्या 3 लाख 23 हजार 189 विद्यार्थ्यांनी पैसे भरू अर्ज पूर्ण केले आहेत. तर अद्यापही 1 लाख 39 हजार 939 विद्यार्थ्यांनी नोंदणी करूनही अर्ज पूर्ण भरला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यात आत्तापर्यंत विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी तब्बल 11 लाख 87 हजार 192 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी 9 लाख 82 हजार 160 विद्यार्थ्यांनी पैसे भरून अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली आहे. तर 2 लाख 5 हजार 31 विद्यार्थ्यांनी केवळ नोंदणी केली आहे. मात्र, अर्ज पूर्ण भरलेला नाही असे सीईटी सेलच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

Back to top button