पुणे : आयपीएलवर बेटिंग; 9 जणांना बेड्या | पुढारी

पुणे : आयपीएलवर बेटिंग; 9 जणांना बेड्या

पुणे; पुढारी वृत्तसेवा : आयपीएल हंगाम नुकताच सुरू झाला असून त्याच धर्तीवर सट्टेबाज अ‍ॅक्टिव्ह झाल्याचे पहायला मिळत आहे. अशाच प्रकारे आयपीएल मॅचवर मोठ्या प्रमाणात सट्टा घेणार्‍या बुकिंवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने कारवाई केली. कोंढवा परिसरात शनिवारी रात्री छापेमारी करत 9 जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या.

हेमंत रवींद्र गांधी (वय 31, रा. रास्ता पेठ), अजिंक्य शामराव कोळेकर (वय 30, रा. 207, नाना पेठ), सचिन सतीश घोडके (वय 35, रा. गोखले वाडा, मद्रासी गणपतीजवळ, रास्ता पेठ), यशप्रताप मनोजकुमार सिंह (वय 22, रा. मानकढिया, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), धमेंद्र संगमलाल यादव (वय 25, रा. कुकडी, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), रिग्लम चंद्रशेखर पटेल (वय 22, रा. मोगलावीर, जि. वाराणसी, उत्तर प्रदेश), अनुराग फुलचंद यादव (वय 32, रा. मुंगारी, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश), इंद्रजीत गोपाल मुजुमदार (वय 30, रा. पंछीबेरिया, 24 परगणा, पश्चिम बंगाल), सतीश संतोष यादव (वय 18, रा. पोहदार, जि. प्रयागराज, उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 1 कॉम्प्युटर, 3 लॅपटॉप, 18 मोबाईल हॅन्डसेट, 92 हजार रुपये रोख असा एकूण 5 लाख 12 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढव्यातील ब्रम्हा आंगन बी/ 2, फ्लॅट नं. 6 येथे काही बुकी आयपीएलच्या मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणावर सट्टा घेत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुनील पवार आणि युनिट-3 चे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट यांना मिळाली होती. त्यानुसार पथकातील कर्मचार्‍यांनी शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कोंढव्यात छापा टाकला. त्या वेळी त्याठिकाणी नऊ जण आयपीएलच्या मॅचवर बेटिंग घेत असल्याचे आढळून आले. पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहआयुक्त संदीप कर्णिक, अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Back to top button