खडकवासला : शिरकाई देवीच्या यात्रेस हजारो भाविकांची गर्दी | पुढारी

खडकवासला : शिरकाई देवीच्या यात्रेस हजारो भाविकांची गर्दी

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा : पानशेतजवळील शिरकोली येथील शिवकालीन श्री शिरकाई देवीच्या यात्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते. देवीचे ऐतिहासिक बगाड पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. बगाड, देवीची पालखी मिरवणूक, पारंपरिक ढोल- ताशे लेझीम खेळाने भाविकांचे लक्ष वेधले. देवीची पारंपरिक पूजा व अभिषेक होऊन शुक्रवारी (दि.7) पहाटे यात्रेस सुरुवात झाली. निवी, अंत्रोली, घिसरच्या पारंपरिक खेळ पथकाला पहिल्या तीन क्रमांकाची बक्षिसे देण्यात आली.

देवस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ पासलकर, सचिव व सरपंच अमोल पडवळ, ज्ञानोबा साळेकर, बिपीन पासलकर, शिवाजी पडवळ, बाळासाहेब भोसले, शंकरराव पडवळ, नामदेव पडवळ, सुनील बोरगे, सुनील साळेकर, पांडुरंग मरगळे आदींसह देवस्थानचे विश्वस्त, ग्रामस्थांनी यात्रेचे नियोजन केले. पुणे, ठाणे, सुरत, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणच्या भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती.

नर्‍हे येथे श्री काळभैरवनाथांच्या उत्सवाचे आयोजन
नर्‍हे गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ देवाच्या उत्सवाचे गुरुवारी (दि. 13) व शुक्रवारी (दि.14) आयोजन करण्यात आले आहे. गुरूवारी पहाटे देवास अभिषेक, आरती, महानैवेद्य, संध्याकाळी आरती व पालखी मिरवणूक होणार आहे. शुक्रवारी रात्री नऊ वाजता भिका भीमा सांगवीकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. या उत्सवात यंदा कुस्त्यांचा आखाडा, ढोल-लेझीम पथक व छबिन्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. श्री काळभैरवनाथ उत्सव कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री काळभैरवनाथ उत्सव सुतारवाडी येथे साजरा
श्री काळभैरवनाथ देवाचा उत्सव नुकताच साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पालखी मिरवणूक, भजनी मंडळाचा कार्यक्रम, ढोल-ताशावादन, लेझीम खेळ आदी कार्यक्रमांचा यात समावेश होता. महादेव मंदिर ते भैरवनाथ मंदिरादरम्यान पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सुतारवाडी ग्रामस्थांच्या वतीने या उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गोविंद रणपिसे, शाम रणपिसे, बालम सुतार, दिलीप रणपिसे, हनुमंत खेडेकर, विनोद खेडेकर, सचिन रणपिसे, अतुल रणपिसे आदींनी या उत्सवाचे नियोजन केले.

Back to top button