मानसोपचारांमध्ये होमिओपॅथीचा होतोय प्रभावी वापर | पुढारी

मानसोपचारांमध्ये होमिओपॅथीचा होतोय प्रभावी वापर

पुणे; पुढारी वृत्तसेवा : जीवघेणी स्पर्धा, कुटुंबातील बदलते प्राधान्यक्रम, वाढता चंगळवाद, अतिरेकी स्क्रीनटाईम अशा नानाविध कारणांमुळे लहान मुलांमध्ये एकलकोंडेपणा, चिडचिड, रागीट स्वभाव आणि मानसिक ताणतणावांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये मानसोपचार, समुपदेशन यांची गरज मोठ्या प्रमाणात भासू लागली आहे. मानसोपचारांमध्ये होमिओपॅथी औषधांचा प्रभावी वापर होत आहे.

जगभरात 10 एप्रिल हा जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून साजरा केला जातो. यंदाच्या होमिओपॅथी दिवसाचे बोधवाक्य ’एक आरोग्य, एक कुटुंब’ असे आहे. चिंता, नैराश्य इत्यादींसह विविध मानसिक आरोग्य स्थितींवर उपचार करण्यासाठी होमिओपॅथीच्या वापरावर लक्ष केंद्रित होत असल्याचे गेल्या काही वर्षांमध्ये अधोरेखित होत आहे. मानसिक आजाराची लक्षणे, मूळ कारणे आणि उपचार यामध्ये होमिओपॅथीच्या औषधांना मानसोपचारतज्ज्ञ, समुपदेशकांकडून पसंती दिली जात आहे.

मानसोपचार, जुनाट आजार, त्वचाविकार आदींमध्ये होमिओपॅथिक औषधे महत्त्वाची भूमिका बजावतात. कोरोना प्रतिबंधक उपचारांमध्येही होमिओपॅथीने मोलाचा वाटा उचलला. आयुष मंत्रालय स्थापन झाल्यानंतर होमिओपॅथीचे महत्त्व नव्याने अधोरेखित झाले. या शाखेमध्ये औषधे देताना वैद्यकीय पार्श्वभूमी, कौटुंबिक स्थिती, मानसिक स्थिती आदींची माहिती घेऊन दोष समूळ नष्ट केले जातात.

                           – डॉ. अजित फुंदे, माजी अध्यक्ष, होमिओपॅथी परिषद

मानसोपचारांमध्ये आजारामागील मूळ कारणे जाणून घेतली जातात. होमिओपॅथी औषधांचा गुण येण्यास वेळ लागत असला, तरी दोष मुळासकट नष्ट होतात. सर्व वयोगटाच्या रुग्णांना होमिओपॅथी औषधांचा उपयोग होतो. औषधांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

                                 – डॉ. वसीम चौधरी, होमिओपॅथी

Back to top button