

प्रसाद जगताप
पुणे : पुणे आरटीओकडून महिन्याला 25 हजारांच्या घरात पक्का परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) घेऊन नवे वाहनचालक रस्त्यावर येत असल्याचे समोर आले आहे. मागील तीन महिन्यांत पुणे आरटीओत करण्यात आलेल्या परवान्यांच्या नोंदीवरून ही माहिती समोर आली आहे. अलीकडच्या काळात 18 वर्षे वय पूर्ण होण्याआधीच तरुणाई घरातील पालकांची वाहने घेऊन सुसाट जाताना पहायला मिळतात. मिसरूडही न फुटलेली तरुणाई शाळा, महाविद्यालयांमध्ये दुचाकी, चारचाकी वाहने घेऊन जाताना पहायला मिळत आहेत.
त्यात महत्त्वाचे म्हणजे पालकांना मोटार वाहन कायद्यातील नियमांची माहिती नसल्यामुळे मुलांच्या हट्टास्तव पालकही आपले वाहन मुलांना देतात. याबाबत परिवहन विभागाकडून अनेकदा जनजागृती, दंडात्मक कारवाई केली जाते. त्याला घाबरून तरुणाई आता गाडी व्यवस्थित चालवायला येवो न येवा लगेचच आरटीओ गाठून परवाना काढण्यावर भर देत आहे. यामुळे महिन्याला पुण्यात सरासरी 25 हजार नवे वाहनचालक रस्त्यावर येत आहेत.
महिन्याला वीस हजार कच्चे परवाने
पुणे आरटीओच्या माध्यमातून आळंदी रस्ता आणि आयडीटीआर येथे चाचणी घेऊन परवाना दिला जातो. तर संगम ब—ीज येथील कार्यालयात चाचणी घेऊन कच्चा परवाना दिला जातो. यात महिन्याला सरासरी 25 हजार जणांना पक्का परवाना तर 20 हजारांच्या घरात कच्च्या परवान्याचे वाटप केले जात असल्याचे पहायला मिळत आहे.
अशी आहे आकडेवारी
जानेवारी महिन्यातील वितरण
महिना कच्चा परवाना पक्का परवाना
जानेवारी 23,251 27,522
फेब—ुवारी 19,863 25,326
मार्च 19,492 25,605
वाहन परवाना काढण्यासाठी नागरिकांचा चांगला प्रतिसाद असतो. त्यांच्या वाढत्या प्रतिसादामुळे आणि उन्हाच्या कडाक्यापासून त्यांचे संरक्षण होण्यासाठी आम्ही सध्या वाहन परवाना चाचणी सकाळी 7 वाजल्यापासूनच सुरू केल्या आहेत. वाहन परवाना चाचणीसाठी आलेल्या नागरिकांना उन्हाचा प्रचंड त्रास होत असल्याचे आमच्या निदर्शनास आले होते, त्यामुळे आम्ही ही व्यवस्था केली आहे.
– डॉ. अजित शिंदे,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे