इंदापूरात पिकांचे नुकसान; वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पत्रे गेले उडून | पुढारी

इंदापूरात पिकांचे नुकसान; वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे पत्रे गेले उडून

भवानीनगर(ता. इंदापूर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये शनिवारी (दि. 8) संध्याकाळी विजांचा कडकडाट व वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामध्ये शाळेवरील व शेडचे पत्रे उडून गेले. या वेळी शेतकर्‍यांच्या पिकांचे देखील नुकसान झाले. शनिवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार वादळी वार्‍यासह व विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.

सुमारे अर्धा ते पाऊण तास वादळी वार्‍यासह पाऊस झाला. या वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामध्ये हिंगणेवाडी येथील प्राथमिक शाळेच्या इमारतीच्या छताचे पत्रे उडून गेले. यामध्ये शाळेच्या तीन वर्गखोल्यांपैकी दोन वर्गखोल्यांचे पत्रे उडून जाऊन इमारतीचे नुकसान झाले, तसेच पवारवाडी येथील सुनील चव्हाण यांच्या शेतातील मका पीक भुईसपाट झाले. सुनील चव्हाण यांच्या घराजवळ असलेल्या पत्राशेडचे पत्रे वादळी वार्‍यामध्ये उडून गेले आहेत.

येथील अक्षय घोडके यांनी घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे पत्राशेड उभा करून त्यामध्ये धान्य साठवून ठेवले होते. ते पत्राशेड उडून गेले असून साठवून ठेवलेल्या धान्याचे नुकसान झाले, तसेच सुभाष घोलप यांचे बाजरीचे पीक व दिलीप थोरात यांचे मकाचे भुईसपाट झाले आहे. या नुकसानीचे तहसीलदार यांनी त्वरित पंचनामे करण्याचे आदेश देऊन शेतकर्‍यांना शासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी या शेतकर्‍यांमधून होत आहे.

Back to top button