पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत कुठलीही चर्चा नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे | पुढारी

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीबाबत कुठलीही चर्चा नाही : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

वडगाव मावळ : खासदार गिरीश बापट यांचे नुकतेच निधन झाले आहे. अजूनही त्यांचे कुटुंबीय किंवा पक्षावर दुःखाचे सावट आहे. असे असताना पोटनिवडणुकीबाबत कशाला चर्चा करता, मीही कुठलीही चर्चा करणार नाही, असे स्पष्ट करत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत तूर्त कुठलीही चर्चा नसल्याचे स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे केले. आंबी येथे शिरे शेटेवाडी पुनर्वसन प्लॉट वाटपप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री संजय भेगडे होते. तर, प्रमुख पाहुणे म्हणून खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते. या वेळी रिपाइंचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, निवृत्ती शेटे, राजाराम शिंदे, गुलाबराव म्हाळसकर, शांताराम कदम, सोपानराव म्हाळसकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप काकडे, महिलाध्यक्षा सायली बोत्रे आदी उपस्थित होते.

शिरे-शेटेवाडी पुनर्वसन झाले आता पुढची जबाबदारी माझी
मावळ तालुक्यातील शिरे शेटेवाडी पुनर्वसनाचा गेली अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न राज्य सरकारच्या माध्यमातून मार्गी लागला आहे. आता यासंदर्भातील ज्या गोष्टी राहिल्या असतील त्या महिनाभरात पूर्ण करण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

सातबारा उतार्‍यांचे वाटप
या वेळी लाभार्थी शेतकर्‍यांना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, माजी मंत्री भेगडे, खासदार बारणे यांच्या हस्ते प्लॉटच्या सातबारा उतार्‍यांचे वाटप करण्यात आले. तसेच, गेली 23 वर्षे या पुनर्वसनाच्या लढ्यासाठी सातत्याने प्रयत्न केलेले दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या कुटुंबीयांचा तसेच माजी उपसभापती शांताराम कदम व मधुकर धामणकर, जागा उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल तत्कालीन सरपंच मीरा वारिंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

खर्‍या अर्थाने आज शेतकर्‍यांचा लढा संपला
माजी मंत्री बाळा भेगडे म्हणाले, की गेली अनेक वर्षे पुनर्वसनासाठी सुरू असलेला हा लढा आज खर्‍या अर्थाने संपला आहे. असा उल्लेख करून या पुनर्वसन प्रश्नासह एमआयडीसी टप्पा 4 मधील शेतकर्‍यांना योग्य भाव मिळवून देणे, रखडलेले पेमेंट वाटप करणे, नवलाख उंबरे हद्दीतील 719 एकर क्षेत्रावरील एमआयडीसीचे शिक्के काढणे ही कामेही फक्त युती सरकारमुळेच झाली असल्याचा दावा केला. परंतु, काही मंडळी फुकटच श्रेय घेतात, असा टोला लगावला.

 

दिवंगत माजी आमदार दिगंबर भेगडे, माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली गेली अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्याने व राज्य सरकारमुळे पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लागला आहे. शेतकर्‍यांना न्याय उशिरा मिळाला असला तरी जागा चांगल्या व योग्य ठिकाणी मिळाल्यामुळे शेतकरीही समाधानी आहेत. पश्चिम महाराष्ट्रात अशा पध्दतीने पहिल्यांदाच पुनर्वसन झाले आहे.
                                    – शांताराम कदम, माजी उपसभापती

आम्ही समाजासाठी कवडीमोल दराने सरकारला आमच्या जमिनी दिल्या; पण केवळ दोन गुंठ्यांसाठी आम्हाला मात्र 23 वर्ष लढा द्यावा लागला याचं खूप वाईट वाटतं. आता घरकुलसाठी निधी, एमआयडीसीमध्ये किमान दोन टक्के प्राधान्य, नागरी सुविधा मिळाव्यात इतकीच अपेक्षा आहे.
                                                          – मधुकर धामणकर, शेतकरी

Back to top button