मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या निधीवरून आजी-माजी आमदारांची जुंपली ! | पुढारी

मावळ तालुक्यातील विद्युत विभागाच्या निधीवरून आजी-माजी आमदारांची जुंपली !

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील विद्युतविषयक कामांसाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर झाला असताना आमदार सुनील शेळके मात्र 5 कोटी 62 लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याचे सांगत आहेत. आमदारांना मंजूर निधीची बेरीजही जमत नसल्याचा टोला मारून त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारणे बंद करावे, अशी टीका माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केली आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 7 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर

आमदार शेळके यांनी तालुक्यातील विद्युतविषयक कामांसाठी 5 कोटी 62 लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली होती. या पार्श्वभूमीवर माजी मंत्री भेगडे यांनी आमदार शेळके यांच्यावर टीका केली. वास्तविक मागील महिन्यात तालुक्यातील विद्युत विभागाच्या कामासाठी 10 कोटी रुपये निधी देण्याची मागणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार, पालकमंत्री पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 7 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती माजी मंत्री भेगडे यांनी दिली. तसेच, संबंधित सर्व कामे लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचेही सांगितले.

फुकटचे श्रेय घेण्याची घाई
मंजूर झालेल्या 7.50 कोटी निधीपैकी श्री विठ्ठल रखुमाई तुकाराम महाराज मंदिर भंडारा डोंगर ट्रस्टच्या विद्युत कामासाठी 1 कोटी 39 लाख 48 हजार रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे.

उर्वरित निधी तालुक्यातील सोमाटणे, सांगवडे, साळुंब—े, धानगव्हाण, उर्से, राजपुरी, कामशेत, कल्हाट, वडगाव, ब—ाम्हणोली, सांगीसे, आढे, काले, चावसर, थुगाव, कोथुर्णे बऊर, पुसाणे, ठाकुरसाई, शिळिंब, चिखलसे, नाणे, इंदोरी, उकसान, आढले, कशाळ, जांबवडे, भोयरे, जांभुळ, चांदखेड, कडधे, गहुंजे आदी गावांना निधी मंजूर झाल्याचे माजी मंत्री भेगडे यांनी सांगितले. तसेच, आमदारांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचे काम आमदारांनी बंद करावे आणि फुकटचे श्रेय घेण्यास घाई करू नये, असा असाही इशारा
दिला आहे.

त्यांनी आयत्या पिठावर रेघोट्या मारणे बंद करावे : बाळा भेगडे

 

जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्यात विद्युत विभागाच्या कामांसाठी मिळालेल्या निधीसंदर्भात माजी मंत्री बाळा भेगडे यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना आमदार सुनील शेळके यांनी केवळ 25 लाखांच्या निधीचा अधिकार असणार्‍या निमंत्रित सदस्यांनी मधेमधे नाक खुपसू नये, अशी टीका केली आहे. वास्तविक जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेक कामे मंजूर झाली आहेत. पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी लोकप्रतिनिधी म्हणून व संबंधित विभागाचे अधिकारी यांनी सुचविल्यानुसार ही कामे होत असतात.

राजकीय वजन वापरून दहा अर्धवट कामे पूर्ण करा
गुरुवारी वडगाव मावळ येथे झालेल्या आढावा बैठकीत जी कामे मंजूर झाली आहेत. त्यासंबंधीची माहिती विद्युत विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली होती. नागरिकांच्या मागणीनुसार ही कामे मंजूर करण्यात आली आहेत आणि या मंजूर झालेल्या कामांबाबत मी स्वतः पालकमंत्र्यांचे जाहीर आभारदेखील मानले होते. त्यामुळे पंचवीस लाख रुपये निधीचा अधिकार असलेल्या निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये. तसेच, राज्यात आणि केंद्रात तुमचे सरकार आहे, तुमचे असलेले राजकीय वजन आणि संबंध वापरून जी दहा कामे तालुक्यातील सुचवली आहेत, ती पूर्ण करण्यासाठी त्याचा उपयोग करावा, किरकोळ कामांमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नये, अशी टीकाही आमदार शेळके यांनी केली.

निमंत्रित सदस्याने मधेमधे नाक खुपसू नये : आमदार सुनील शेळके

Back to top button