श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान | पुढारी

श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे 10 जूनला प्रस्थान

देहुगाव : पुढारी वृत्तसेवा : पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तिर्थव्रत।
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याचा कार्यक्रम देहू देवस्थान संस्थानकडून शनिवारी (दि. 8) जाहीर करण्यात आला. येत्या 10 जून रोजी श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा श्रीक्षेत्र देहूगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे, अशी माहिती देहू देवस्थान संस्थानच्या वतीने पत्रकार परिषदेत देण्यात आली.

या वेळी संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तममहाराज मोरे, विश्वस्त संजयमहाराज मोरे, संतोषमहाराज मोरे, माणिकमहाराज मोरे आदी उपस्थित होते. देहू देवस्थानच्या वतीने श्री संत तुकाराम महाराजांच्या 338 व्या पालखी सोहळ्याचा प्रस्थान आणि परतीच्या प्रवासाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. या वेळी पालखी सोहळाप्रमुख संजयमहाराज मोरे, भानुदासमहाराज मोरे, अजितमहाराज मोरे यांची पालखी सोहळा प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे.

पालखी सोहळ्यातील महत्त्वाचे बदल
लोणी काळभोर येथून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी 15 जूनला यवत मुक्कामी जाण्यासाठी प्रस्थान करेल. परंतु, उरुळी कांचन येथील दुपारच्या विसाव्यासाठी पालखी सोहळा गावात न जाता रस्त्यावरच विसाव्यासाठी थांबणार आहे. भांडगाव तसेच बरहाणपूर या ठिकाणीदेखील पालखी सोहळा दुपारच्या विसाव्यासाठी गावात न जाता रस्त्यावरच पालखी सोहळा दुपारचा विसावा घेणार आहे.

इंदापूरचा मुक्काम आयटीआय मैदानावर
यंदा 22 जून रोजी होणारा इंदापूरचा मुक्काम शासकीय पालखी स्थळावर म्हणजेच आयटीआय मैदानावर होणार आहे. देहू देवस्थान संस्थानच्या वतीने पंढरपूरमध्ये नवीन पालखी मुक्काम मंदिर तयार करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा ज्येष्ठ आषाढ शुद्ध एकादशी (29 जून) ते ज्येष्ठ आषाढ गुरुपौर्णिमा (3 जुलै) दुपारपर्यंत पालखी सोहळा श्री संत तुकाराम महाराज संस्थान (मंदिर) नवी इमारत येथे मुक्कामास असणार आहे. असे महत्त्वाचे बदल यंदाच्या पालखी सोहळ्यात करण्यात आले आहेत.

Back to top button