खेड-शिवापूर भागांत मुसळधार; वादळी वार्‍याने घरांचे पत्रे उडाले | पुढारी

खेड-शिवापूर भागांत मुसळधार; वादळी वार्‍याने घरांचे पत्रे उडाले

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : शिवगंगा खोर्‍यात शनिवारी (दि. 8) संध्याकाळी 6 च्या सुमारास वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस झाला. पाऊण तास झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले असून, घरांचे पत्रे उडाले. विजेचे खांब वाकले तर पुणे-सातारा रस्त्यावरील होर्डिंग्ज पडले. तब्बल पाऊण तास सुरू असलेल्या पावसामुळे पुणे-सातारा महामार्ग तसेच सेवा रस्ते यांना ओढ्याचे स्वरूप निर्माण झाले होते. पुणे-सातारा रस्त्यावरील सखल भागामध्ये काही ठिकाणी पाणी साचले.

यामुळे वाहनचालकांना वाहन चालवताना कसरत करावी लागत होती. परिणामी, पुणे-सातारा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पावसाची उघडीप झाल्यामुळे वाहतूक काही काळानंतर सुरळीत झाली. वादळ एवढ्या जोरात होते की, गोगलवाडी (ता. हवेली) गावाच्या हद्दीत राहणार्‍या शिंदे कुटुंबाचे पत्र्याचे घर अक्षरशः कोसळले. तसेच वेळू (ता. भोर) या गावाच्या कडेने डोंगर असल्याने डोंगरावरील पाणी मोठ्या प्रमाणात पुणे-सातारा रस्त्यावर येऊन रस्त्याला पुराचे स्वरूप निर्माण झाले होते.

सन 2013 ची आठवण
शनिवारी झालेल्या पावसाने सन 2013 मध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसाची आठवण झाली. त्या वेळी झालेल्या दुर्घटनेत माय-लेकीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे आता तरी संबंधित प्रशासनाने गटाराची कामे तसेच अनधिकृतपणे डोंगरावरील बांधकामे त्वरित हटवावी, अशी मागणी आता परिसरातून होत आहे.

Back to top button