

हिरा सरवदे
पुणे : शहरातील नागरिकांचा वेळ व पैसा वाचण्यासाठी महापालिकेने व्हॉट्सअॅपवर सुरू केलेल्या चॅटबॉटचा नागरिकांना चांगला फायदा होत आहे. मागील दोन महिन्यांत या प्रणालीतून दिल्या जाणार्या वेगवेगळ्या 80 सेवासुविधांचा जवळपास 18 हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे.
ऑनलाइन प्रणाली विकसित
नागरी सेवासुविधा, विभिन्न विभागांची बिले भरणे, परवाना काढणे, परवान्यांचे नूतनीकरण करणे, विविध दाखले देणे, नाहरकत प्रमाणपत्र, या सेवांसाठी नागरिकांना महापालिका भवन किंवा क्षेत्रीय कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागत होत्या. मात्र, ई-गव्हर्नन्स सुरू झाल्यानंतर महापालिकेने विविध सेवासुविधा ऑनलाइन उपलब्ध करून देणारी प्रणाली विकसित केली आहे.
कसा घ्यावा लाभ?
महापालिकेने जारी केलेला 8888251001 हा क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह केल्यानंतर 'हाय' शब्द टाईप करावा. पुढील संवाद सुरू होतो. दोन महिन्यांपासून 19 विभागांच्या 80 पेक्षा जास्त सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
कोणत्या सुविधा मिळतात?
जन्म-मृत्यू नोंदणी व दाखले, पाळीव प्राण्यांची नोंदणी, बांधकाम प्रस्ताव दाखल करणे, आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांसह खातेप्रमुखांचे नंबर, विविध विभागांची माहिती, दैनंदिन निगडित गरजांसोबतच तक्रार नोंदणी, विविध प्रकारचे मिळकत कर, पाणीपट्टी बिल, फेरीवाला देयक, जाहिरात फलक याची बिले भरणे, कुत्रा पाळणे परवाना, फांद्या छाटणी परवानगी, झाड तोडणे परवानगी, जाहिरात फलक परवाना, नवीन नळजोडणी अर्ज, विवाह नोंदणी प्रमाणपत्र, मिळकत कर नाहरकत प्रमाणपत्र, मिळकत हस्तांतरण, वारसाहक्क हस्तांतरण, तक्रार दाखल व तक्रारीची सद्य:स्थिती पाहणे, शहरी गरीब आरोग्य योजना, पंडित दीनदयाळ अपघात विमा योजना, पंतप्रधान आवास योजना, प्राणी दत्तक, खेळाडू दत्तक, मागासवर्गीय कल्याणकारी योजना, अपंग कल्याणकारी योजना, महिला बालकल्याण योजना, महिला सक्षमीकरण योजना, युवक कल्याणकारी योजना.
या प्रणालीमुळे नागरिकांचा वेळ, पैसा वाचत आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी व्हॉट्सअॅप चॅटबॉटचा नंबर सेव्ह करून या प्रणालीचा लाभ घ्यावा.
– राहुल जगताप, उपायुक्त, माहिती व तंत्रज्ञान विभाग, महापालिका