पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये नेमणार समुपदेशक | पुढारी

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये नेमणार समुपदेशक

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पिंपरी चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये समुपदेशकांची नेमणकू करण्यात येणार आहे. यामागे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य उत्तम ठेवण्याचा उद्देश असून त्यांना प्रबोधनाबरोबरच प्रशिक्षणदेखील देण्याची गरज आहे. याकरिता 32 मानसोपचार समुपदेशकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

105 शाळांमध्ये प्रकल्प सुरू करण्यात येणार
महापालिकेच्या 105 प्राथमिक व 18 माध्यमिक शाळांमध्ये जवळपास 45 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. हे विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असतात. अशा विद्यार्थ्यांना आजूबाजूचे वातावरण, घरातील समस्या याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होतो. त्यामुळे त्यांची मानसिकता स्थिर राहत नाही. एखादा विद्यार्थी सर्वसामान्य मुलांपेक्षा वेगळा वागत असेल तर त्याला कोणत्या अडचणी आहेत, हे जाणून घेणे आवश्यक असते.

या शाळांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या कौटुंबिक प्रतिकूल परिस्थितीचा विचार करत त्यांना मानसशास्त्रीय समुपदेशनाचा लाभ देण्याच्या उद्देशाने सुरुवातीला महापालिकेच्या 105 शाळांमध्ये हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सीएसआर किंवा एखाद्या संस्थेच्या माध्यमातून आउट सोर्सिंग करण्यात येणार आहे. सध्या आकांक्षा फाउंंडेशनच्या ताब्यात असलेल्या 5 शाळांमध्ये 5 समुपदेशक आहेत. तर, माध्यमिक शाळांमध्ये सांगात फाउंडेशनचे 8 समुपदेशक कार्यरत आहे. आता नव्याने ज्या शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या हजारावर आहे. अशा शाळांमध्ये 3 ते 5 समुपदेशकांची नेमणूक करण्यात येणार आहे.

Back to top button