…अन् पं. कुमार गंधर्व यांनी दिली गायनाची संधी | पुढारी

...अन् पं. कुमार गंधर्व यांनी दिली गायनाची संधी

पुणे; पुढारी वृत्तसेवा : माझी आजी सरस्वतीबाई राणे व हिराबाई बडोदेकर यांच्यामुळे गायनाचे धडे मला सतत मिळाले. अनेक मोठ्या कलाकारांचा राबता घरात असायचा. पं. कुमार गंधर्व यांच्या खूप आठवणी घरात ऐकायला मिळाल्या. पं. गंधर्व यांच्या कुटुंबाचा जवळचा संबंध होता. पं. गंधर्व यांची शैली वेगळी होती, हृदयाला भिडणारी होती. आम्ही इंदूरमध्ये असताना येथे त्यांना भेटण्याची संधी आम्हाला मिळाली. माझ्या आजीने मला त्यांच्यापुढे बंदिश गायला सांगितली.

पं. गंधर्व यांना माझे गायन आवडले आणि या गायनाच्या संधीमुळे मला दिल्लीच्या कार्यक्रमात गायनाची संधी दिल्याची हृदयस्पर्शी आठवण ज्येष्ठ गायिका मीना फातर्पेकर यांनी शनिवारी सांगितली. दिवंगत ज्येष्ठ गायक पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ दिनानिमित्त पुणे कला क्रीडा केंद्रातर्फे विशेष कार्यक्रम झाला, त्या वेळी फातर्पेकर यांनी आठवणींना उजाळा दिला.

माजी आमदार उल्हास पवार, ज्येष्ठ गायक पं. डॉ. मोहनकुमार दरेकर, पं. राजेंद्र कंदलगावकर, आयोजक मोहन जोशी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पं. गंधर्व यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. पं. गंधर्व यांच्या सुरेल गायनाच्या कार्यक्रमात श्रोते तल्लीन झाले होते. अचानक लाइट गेली. मेणबत्या लावल्या गेल्या, त्याचे भानही श्रोत्यांना नव्हते. इतके सारे तल्लीन झाले होते. त्यांचे निर्गुणी भजनाचे स्वर मला ऐकायला मिळाले, हे माझे भाग्य असल्याचे उल्हास पवार यांनी सांगितले.

एका कार्यक्रमात पं. कुमार गंधर्व यांना भेटता आले. ईश्वराचे दर्शन वारंवार होत नाही, तर ते एकदाच होते. असेच पं. कुमार गंधर्व यांच्या गाण्यात होते. त्यांचे गाणे पुढील पिढीला नक्कीच दिशा देणारे आहे, अशी भावना पं. डॉ. दरेकर यांनी व्यक्त केली. पुण्यात पं. गंधर्व यांचे स्मारक उभारण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत, असे जोशी यांनी सांगितले.

Back to top button