ताई कचरा आण, तरी रस्त्यावर घाण ! देहूगावात रस्त्याच्याकडेला कचर्‍याचे ढीग | पुढारी

ताई कचरा आण, तरी रस्त्यावर घाण ! देहूगावात रस्त्याच्याकडेला कचर्‍याचे ढीग

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा :  श्रीक्षेत्र देहूगाव येथे नगरपंचायतीच्या वतीने कचरा व्यवस्थापन करण्यात आले असले तरी अनेक नागरिक मात्र घरातील कचरा रस्त्याच्याकडेला टाकत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे देहू, माळीनगर, परंडवाल चौक ते सांगुर्डी फाटा, तसेच सांगुर्डी फाटा ते वडाचा माळ या बाह्यवळण रस्त्याच्याकडेला ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग दिसून येत आहेत.

कचरा वर्गीकरणासाठी जनजागृती
देहूनगर पंचायतीच्या वतीने कचरा गोळा करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी घंटा गाड्यांची सोय केली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे. शिवाय घंटागाडी आपल्या भागात आली आहे, हे कळण्यासाठी मधुर आवाजातली धून ऐकवली जाते. ‘आण गं आण ताई, कचरा आण, ओला सुका कचरा आण, ओल्या कचर्‍यासाठी, सुक्या कचर्‍यासाठी, आली आली घंटागाडी हे गाणे ऐकवले जात आहे.

परिसरात दुर्गंधी
देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती केली जात असतानाही काही नागरिक घंटागाडीत कचरा न टाकता रस्त्याच्याकडेला टाकतात. यांना कोणी हटकले तर आमच्याकडे घंटागाडी येत नाही, असे म्हणतात. ज्यांना कामामुळे वेळ मिळत नाही, त्यांनी आपल्या घरात साठलेला कचरा जिथे घंटागाड्या थांबलेल्या असतात तिथे जावून टाकण्याचे सौजन्य दाखवले तर गाव स्वच्छ राहील.
गावातील काही नागरिकांमुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रस्त्याच्याकडेला कचरा टाकणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Back to top button