76 व्यापारी गाळे वापराशिवाय पडून ; पिंपरी चिंचवड महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान | पुढारी

76 व्यापारी गाळे वापराशिवाय पडून ; पिंपरी चिंचवड महापालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  महापालिकेचे शहरातील 76 व्यापारी गाळे हे सध्या वापराविना पडून आहेत. त्यामध्ये सवार्ंधिक 58 गाळे हे भोसरीतील व्यापारी संकुलात आहेत. पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर हे गाळे असल्याने त्याला मागणी नसल्याचे महापालिका भूमी व जिंदगी विभागातील अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले. लीज डीड किंवा भाडेतत्त्वावर हे गाळे वितरित झाले नसल्याने महापालिकेचे सध्या लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचे शहरामध्ये क्षेत्रीय कार्यालयनिहाय एकूण 663 व्यापारी गाळे आहेत. त्यापैकी 40 गाळ्यांचा वापर महापालिकेमार्फत केला जात आहे. 382 गाळ्यांचे लीज डीड तत्त्वावर वितरण झाले आहे. तर, दरमहा भाडेतत्त्वावर 165 गाळे देण्यात आले आहेत. तथापि, 76 गाळे रिक्त असून त्यांचे वितरण झालेले नाही. तर, प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वानेदेखील गाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.

मागणीनुसार ‘लीझ डीड’
महापालिकेच्या व्यापारी गाळ्यांचे नागरिकांच्या मागणीनुसार 5 ते 10 वर्षांसाठी ‘लीझ डीड’ केले जाते. त्यासाठी एकरकमी 3 ते 10 लाख रुपये इतके शुल्क आकारण्यात येते. तर, प्रभाग स्तरावर दरमहा भाडेतत्त्वाने देखील गाळ्यांचे वितरण झाले आहे. त्यासाठी गाळ्यांच्या क्षेत्रानुसार 3 ते 12 हजार रुपये इतके दरमहा भाडे घेण्यात येत आहे.

सांस्कृतिक केंद्र ठरू शकतात उत्पन्नाचे साधन
पालिकेने नागरिकांना विविध कार्यक्रम घेता यावे, या उद्देशाने शहरात विविध ठिकाणी सांस्कृतिक केंद्र, सभागृहांची उभारणी केलेली आहे. त्यातील काही सांस्कृतिक केंद्रांमध्ये सध्या ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र, विविध कलाकौशल्याचे क्लासेस सुरु आहेत. यातील काही केंद्र व सभागृह ठराविक कालावधीसाठी भाडेतत्त्वावर देऊन महापालिका उत्पन्न कमावते आहे. मात्र, सरसकट सर्व सांस्कृतिक केंद्रांबाबत ही स्थिती नाही. त्याबाबत योग्य नियोजन केल्यास महापालिकेच्या उत्पन्नात भर पडू शकते.

महापालिकेच्या रिक्त असलेल्या 76 व्यापारी गाळ्यांचे वितरण करण्यासाठी पाठपुरावा सुरूआहे. भोसरी येथे सर्वाधिक शिल्लक 58 गाळ्यांचे वितरण दिवाळीपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे, त्यासाठी सध्या 20 ते 25 जणांचे अर्ज आले आहेत.
            – प्रशांत जोशी, सहाय्यक आयुक्त, भूमी आणि जिंदगी विभाग, महापालिका

 

Back to top button