पुणे : केमोथेरपीच्या दुष्परिणामांवर आयुर्वेदाची मात्रा | पुढारी

पुणे : केमोथेरपीच्या दुष्परिणामांवर आयुर्वेदाची मात्रा

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अश्वगंधा आणि शतावरी यांसारख्या आयुर्वेदिक वनस्पती मानवी शरीरात रोगप्रतिकारशक्ती निर्माण करतात. त्यांच्या सेवनाने कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांचे दुष्परिणाम रोखता येतात, ही बाब संशोधनातून सिद्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. आकाश सग्गम यांनी पीएच.डी. अभ्यासांतर्गत संशोधन केले आहे. डॉ. सग्गम यांना आरोग्यशास्त्र विभागातील प्रा. भूषण पटवर्धन, प्रा. कल्पना जोशी आणि वैद्य गिरीश टिल्लू यांचे मार्गदर्शन लाभले.

सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे डॉ. सुनील गैरोला आणि डॉ. मनीष गौतम यांच्या देखरेखीखाली संशोधन पूर्ण झाले. संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे अर्थसाहाय्य मिळाले. संशोधनाचे सर्व निष्कर्ष मफ्रिटीयर्स इन फार्माकॉलॉजीफ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहेत. डॉ. आकाश व त्यांच्या सहकार्‍यांनी वनस्पतींच्या रोगप्रतिकारक क्षमतेचा उपयोग उंदराचे ममायलो-सप्रेशनफ अर्थात पांढर्‍या पेशी लोप पावण्याची प्रक्रिया रोखण्यासाठी केला.

या प्रयोगात कर्करोगाच्या उपचारात नेहमी वापरल्या जाणार्‍या पॅक्लिटॅक्सेल नामक औषधाने उंदरामध्ये ममायलो-सप्रेशनफ उत्पन्न केले गेले. अश्वगंधा आणि शतावरी या वनस्पतींच्या अर्क सेवनाने ममायलो-सप्रेशनफ यशस्वीपणे रोखले गेले. पॅक्लिटॅक्सेल औषधामुळे प्राण्यांमध्ये दिसून आलेल्या थकवा, सांधेदुखी आणि केसगळती या दुष्परिणामांनाही आळा बसल्याचे दिसून आले.

संशोधनाने आयुर्वेदातील रसायन संकल्पनान्वये प्रतिकारक्षमतेचा समतोल राखला जातो. संशोधनाचा पुढील टप्पा प्रत्यक्ष कर्करोगाच्या रुग्णांवर रसायन संकल्पनेचा स्वास्थ्यकारक उपयोग असू शकतो. आयुर्वेद, कर्करोग, विज्ञान, रोगप्रतिकारशक्ती आणि माहिती तंत्रज्ञान यातून साकारणारी एकात्मिक स्वास्थ्यप्रणाली हे संशोधनाचे मुख्य विषय आहेत.

                                                      – डॉ. आकाश सग्गम.

Back to top button