पुणे : सीबीएसई शाळांत पूर्वप्राथमिक ते दुसरीचा नवीन शैक्षणिक आराखडा होणार लागू | पुढारी

पुणे : सीबीएसई शाळांत पूर्वप्राथमिक ते दुसरीचा नवीन शैक्षणिक आराखडा होणार लागू

पुणे; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) पायाभूत स्तरासाठीचा राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा स्वीकारला आहे. त्यानुसार बालवाटिका, अर्थात् पूर्वप्राथमिक ते दुसरी हा पाच वर्षांचा तीन ते आठ वर्षांच्या विद्यार्थ्यांसाठी नवीन शैक्षणिक धोरणानुसार आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा 2023-24 पासून लागू केला जाणार आहे.

सीबीएसईने या संदर्भातील परिपत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, 2020 नुसार राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) तीन ते आठ या वयोगटासाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा-पायाभूत स्तर तयार करण्यात आला आहे. त्याची अंमलबजावणी सीबीएसईशी संलग्न शाळांमध्ये करण्यात येईल. शिक्षण आणि शिक्षणासाठी मार्गदर्शन करणार्‍या सक्षमता, शिकण्याचे परिणाम, सामान्य तत्त्वे आणि दृष्टिकोनांची रूपरेषा तयार करणे हे पायाभूत स्तरासाठीच्या अभ्यासक्रम आराखड्याचे उद्दिष्ट आहे.

हा नवीन आराखडा शाळा आणि शिक्षकांसाठी अभ्यासक्रम, अभ्यासक्रम आणि अध्यापन साहित्य विकसित करण्यासाठी मार्गदर्शक ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या नवीन आराखड्याद्वारे शिक्षणाला बळकटी देण्यासाठी आणि सराव करणार्‍या शिक्षकांसाठी नवीन कल्पना आणि संकल्पना अधिक सुलभ बनवण्यास मदत होईल. इयत्ता पहिली ते दहावी-बारावीपर्यंतचे वर्ग उपलब्ध असणार्‍या शाळा पूर्वप्राथमिक वर्ग समाविष्ट करण्यासाठी पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

तर आधीपासून पूर्व प्राथमिकचे वर्ग चालवणार्‍या शाळा ते वर्ग सुरू ठेवू शकतात. पूर्व-प्राथमिक वर्गांसंबंधित माहिती मओएसिस डेटाफ भरताना देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील तरतुदींनुसार पूर्व प्राथमिक वर्ग शाळांमध्ये समाविष्ट करताना विद्यार्थ्यांचे आरोग्य, वर्गखोल्या, खेळण्यासाठीच्या सुविधा, सुरक्षा निकष, शिक्षक आणि कर्मचारी आदी निकषांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button