पुणे : श्रीधर फडके यांनी गदिमा आणि बाबूजींच्या काही आठवणींनाही उजाळा दिला. 'गीतरामायण' लिहिताना, संगीतबद्ध होतानाचे किस्सेही सांगितले. सुकन्या जोशी यांनी केलेल्या उत्कृष्ट निवेदनाने कार्यक्रमाला वेगळेच रूप प्राप्त करून दिले. प्रभू श्री राम यांच्या जीवनचरित्र सांगणार्या 'गीतरामायणा'ला 'दशरथा, घे हें पायसदान…' या गीताने खर्या अर्थाने सुरुवात झाली अन् सुरेल प्रवास सुरू झाला. अयोध्येतील राजा दशरथ यांच्यावर आधारित हे गाणे फडके यांनी सादर करतानाच रसिकांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि रसिकही त्यावर डोलू लागले. 'राम जन्मला ग सखी राम जन्मला…' हे गीत सादर झाले. सगळीकडे आनंदी आनंद पाहायला मिळाला.
फडके यांचा सुरेल आवाज अन् कलाकारांनी सादर केलेल्या कथक नृत्याविष्काराने, नृत्याभिनयाने जणू श्री रामजन्म सोहळ्याची अनुभूती रसिकांना दिली. रामाच्या जन्माने राजदरबारात मंगलमय वातावरण होते, ते कथकच्या भावविश्वातून सुनीला आणि त्यांच्यासोबतच्या सहकलाकारांनी सादर केले. या वेळी कलाकारांनी रंगमंचाच्या खाली येऊन रसिकांना सुंठवडा प्रसाद म्हणून वाटला.
त्यानंतर 'रामा, चरण तुझे लागले, आज मी शापमुक्त जाहलें' हे रामाने अहल्येचा चरणस्पर्शाने उद्धार केल्यानंतर तिने गायलेले गीत सादर झाले. फडके यांनी सादर केलेल्या या गीताला तुषार आग्रे (तबला), आदित्य आपटे (तालवाद्य), तुषार दीक्षित (की-बोर्ड), नीलेश देशपांडे (बासरी) यांनी दिलेली संगीताची साथ; तर गौरी संगळ, अस्मिता पाटील, सुनेत्रा सामंत आणि तुषार सिद्धम यांनी केलेली स्वरसाथ अप्रतिम ठरली. 'ज्येष्ठ तुझा पुत्र मला…' या गीतानंतर 'स्वयंवर झाले सीतेचे…' हे गीत फडके यांनी सादर करताच त्यांच्या सुरात सूर मिसळत रसिकही हे गीत गाऊ लागले. सीतेच्या स्वयंवराचा प्रसंग सुनीला दातार-पोतदार आणि सहकलाकारांनी कथक नृत्यातून प्रत्यक्षपणे उभा केला. त्याला रसिकांची दाद मिळाली. रसिकांनी या गाण्याला 'वन्समोअर' दिला अन् रसिकांच्या आग्रहास्तव फडके यांनी या गीतातील काही कडवी पुन्हा सादर केली.
'जेथे राघव तेथे सीता' या सीतेच्या उद्गाराने श्री राम अत्यंत प्रसन्न झाले. सर्वांचा निरोप घेऊन राम, लक्ष्मण आणि जानकी वल्कले नेसून वनवासासाठी निघाले. सुमंत त्यांना रथातून घेऊन निघाले आणि त्या रथामागे संपूर्ण अयोध्या निघाली. सगळे अयोध्यावासी बाहेर पडले. ते सुमंताला विनवणी करू लागले, तेच सांगणारे 'राम चालले, तो तर सत्पथ । थांब सुमंता, थांबवि रे रथ…' हे गीत सादर झाले. या गीताने तर रसिकांचे डोळे पाणावले. श्री रामांनी सुमंताला अयोध्येला परत जाण्यास सांगितले. श्री राम हे सीता आणि लक्ष्मणासह नौकेमध्ये बसले.
नावाडी नौका वल्हवू लागले व नौका वल्हवत असताना नावाडी गाऊ लागले. 'नकोस नौके, परत फिरूं ग, नकोस गंगे, ऊर भरूं…' हे गीत. हे गीत फडके यांनी सुरेल आवाजात सादर केले आणि कलाकारांनी कथक नृत्याद्वारे सादर करीत मने जिंकली. या गीतावर रसिकांनी 'जय श्री राम'चा जयघोष केला. भरतने आपली आई कैकेयीला उद्देशून 'माता न तूं वैरिणी…' हे त्वेषाने म्हटलेले गीत त्यानंतर सादर झाले. त्या वेळी जुन्या रसिकांना बाबूजींचीच आठवण आली.
भरत श्री रामांना अयोध्येला येण्याची सारखी गळ घालू लागला, हट्ट करू लागला. तेव्हा सर्वज्ञ श्री राम भरतला म्हणाले, 'दैवजात दुःखे भरतां दोष ना कुणाचा । पराधीन आहे जगतीं पुत्र मानवाचा ?' हे 'गीतरामायणा'च्या 56 गीतांच्या माळेतील मेरुमणी ठरलेले गीत सादर झाले. जीवनविषयक तत्त्वज्ञान ऐकत श्रोते स्तब्ध झाले. या गीतानंतर सादर झाले ते 'सेतू बांधारे…' हे गीत. या गाण्यावर फडके यांना रसिकांनी हात उंचावत, टाळ्यांचा कडकडाट करीत आणि 'जय श्री राम'चा जयघोष करीत दाद दिली.
विशेष म्हणजे 'सेतू बांधारे' गाण्यावर रसिक डोलतही होते. सुनीला आणि सहकार्यांनी कथक नृत्याविष्कारातून हुबेहूब तो प्रसंग उभा केला. 'त्रिवार जयजयकार…' या गीतावर फडके यांच्या गायकीला रसिकांनी भरभरून दाद दिली. अयोध्येत दोन वेळा सादरीकरण केल्याची अनुभूती विलक्षण होती, अशी आठवणही फडके यांनी सांगितली. शेवटी 'रघुरायाच्या नगरी जाऊन गा बाळांनो श्री रामायण' हे भैरवी रागातील गीत सादर करीत फडके यांनी कार्यक्रमाची सुरेल सांगता केली. दै. 'पुढारी'च्या मार्केटिंग विभागाचे युनिट हेड संतोष धुमाळ यांनी आभार मानले.